भाजपच्या नेत्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सज्जड इशारा

नवी दिल्ली ,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिवसेना वाढविण्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रयत्न केले? असा सवाल उपस्थित करतानाच हे दोघे आयत्या बिळावरील नागोबा असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. यापुढील काळातही ठाकरे पिता-पुत्रांनी भाजपचे वरिष्ठ नेते तसेच शिंदे गटावर टीका चालू ठेवली आणि भाजपच्या नेत्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.

मुंबईत गोरेगाव येथे गट प्रमुखांच्या झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह शिंदे गट व भाजपवर टीकास्त्र सोडले होते. याला आज भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

राणे यांनी आता थेट ठाकरे पिता-पुत्रांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचे ऐकणारे किती गटप्रमुख आता शिल्लक राहिले आहेत, असा टोमणा मारत राणे पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात ठाकरे यांना गटप्रमुख आठवले नाहीत. सत्तेत असताना त्यांनी किती गटप्रमुखांना नोकरी दिली? व्यवसाय काढून दिला? घर खर्च आणि आजारपणासाठी किती पैसे दिले? किती गटनेत्यांना भेटले? किती निवेदने स्वीकारली? या सर्वांचा त्यांनी जाहीरपणे खुलासा केला पाहिजे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे, त्यांनी मराठी माणसाच्या हिताचे बोलू नये, गद्दारांना दूध पाजले म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी खोक्याच्या रूपात तूप खाल्ले, अशी टीकाही नारायण राणेंनी केली. तुम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काही केले का?, असा सवाल उपस्थित करत आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, असा निशाणा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला.

‘सत्तेचे दूध पाजले म्हणता, पण ते तूप कोणी खाल्ले? मेवा आणि तूप मातोश्रीने खाल्ले. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यामुळे ते देशात कुठेही जाऊ शकतात, त्यांना हा दौरा झोंबला आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली.

‘शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्तेवर आलात. उद्धव ठाकरे स्वार्थी आहेत. मला भाजपमध्ये घेऊ नये म्हणून अमित शाह यांना फोन करत होते. मोदींच्या नावे खासदार निवडून आणले, उद्धव ठाकरेंमुळे पाच खासदार आणि १० आमदार निवडून येणार नाहीत. महाराष्ट्राच्या सत्तेवर गद्दारी करून आलात, खोके घेण्यासाठी आलात,’ असा पलटवार नारायण राणेंनी केला.

‘मुंबईतील नागरिकांचे शोषण केले, टक्केवारीसाठी कलानगरला ऑफिस उघडले. मुंबईला बकाल केले. बेस्ट डबघाईला आणली. मुंबईवर संकटे येतात तेव्हा मोदी मदत करतात,’ असे नारायण राणे म्हणाले. केंद्र सरकार नेहमीच मुंबईला मदत करते, उद्धव ठाकरेंना माहीत नाही. कधी वाचत नाहीत. शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी कधी वाचला नाही. यांना कसे कळणार, केंद्र सरकारने मुंबईसाठी काय दिले. उद्धव ठाकरे हा जगातील सर्वात ‘ढ’ माणूस आहे, अशी खरमरीत टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्री असताना मंत्रालयात न फिरकणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी कोणता त्याग केला? उलट हिंदुत्वाच्या नावावर सत्ता मिळविली, असा आरोप राणे यांनी केला. सत्तेचा मेवा खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंबीयांनी खाल्ल्याचे सांगून ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला मुंबई दौरा उद्धव ठाकरे यांना चांगलाच झोंबल्याचे दिसून आले आहे. खा. संजय राऊत तुरुंगात असताना देखील सभेत त्यांची खुर्ची ठेवण्यात आली. असे कृत्य करणारा उद्धव ठाकरे यांच्यासारखा ‘ढ’ माणूस मी पाहिलेला नाही. मुंबई महानगरपालिकेत कोण किती टक्के देत होता, हे सर्व मला माहिती आहे. प्रत्येक कंत्राटावर १५ टक्के कमिशन ठाकरे यांनी लाटले. आता सर्व कंत्राटदारांना उभे करू, असा इशारा त्यांनी दिला. मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर होते; परंतु आता काय स्थिती आहे. मुंबईला बकालपणा यांच्यामुळे आली आहे. मुंबईसाठी, मातृभूमीसाठी काय केले, हेही ठाकरे यांनी सांगायला हवे.

खासदार भावना गवळी यांचे समर्थन करीत राणे म्हणाले की, बहिणीचे महत्व उद्धव ठाकरे यांना माहीत नाही. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना क्लिन चीट देण्यात आली; परंतु कालच्या सभेत पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली म्हणून टीका केली हे दुर्दैवी आहे. ‘हिंमत असेल तर एका महिन्यात महानगरपालिकेसोबत विधानसभेच्या निवडणुका घ्या’ असे आव्हान ठाकरे यांनी दिले. पण त्यांचे हे आव्हान बालिशपणाचे आहे. ठाकरे यांनी त्यांचे तोंड आता बंद ठेवावे, असा सल्लाही राणे यांनी दिला.

अमित शहांना आव्हान देण्याची उद्धव ठाकरेंची औकात आहे का?

नारायण राणे म्हणाले की, उद्धव म्हणतात मुंबईवर सध्या गिधाडे फिरत आहेत. अरे केंद्रीय मंत्री आहेत ते. देशाचे गृहमंत्री आहेत. देश सांभाळतात. त्यांना असे कसे काय म्हणू शकतात. गिधाडे म्हणणे चुकीचे आहे. असे बोलल्यामुळे तुम्ही जेलमध्ये जाल. तुम्ही तर लबाड लांडगे आहेत, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात आहे का?, असेही राणे यांनी म्हटले. लबाड लांडगे भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, त्यामुळे तुम्हाला लांडगा म्हणतोय, असेही राणे यांनी नमूद केले.