“मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागलीयत”; गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा

मुंबई ,२१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सातत्यानं टीका करण्यात येत आहे. सभा आणि मेळाव्यामधून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यात बोलताना उद्धध ठाकरे यांनी ंमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरुनही जोरदार टीका केलीय. “आज ही एवढी गर्दी आहे, दसऱ्याला किती असेल? किती पटीत असेल, दसरा मेळावा आपल्या पंरपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार”, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

Image

“मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागलीयत. अमित शहा म्हणाले सेनेला जमिन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. आम्ही तुम्हाला आस्मान दाखवू.  मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे,” असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

25 वर्षे आमची युतीत सडली. नालायक माणसं आम्ही जोपासली. वरती पोहचल्यावर लाथा मारायला लागलात. तुमचा वंश कोणता ? बाहेरचे उपरे किती घेतले तुम्ही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.आम्ही केवळ महापालिका नाही तर मुंबईकरांची मनेही जिंकली आहेत. मुंबई विकून दिल्लीश्वरांच्या पुढे टाकायची हे तुमचं ठरलंय असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

May be an image of one or more people, people standing and crowd

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

दुसरीकडे आमचे वडील आहेत ना जागेवर? कारण मुलं पळवणारी टोळी माहिती आहे. पण बाप पळवणारी टोळी सध्या महाराष्ट्रात फिरतेय. मला आश्चर्य वाटतंय की, एवढे वर्ष तुम्ही-आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेच दूध पाजलं, मानमर्यादा दिली आणि आता यांच्या तोंडाची गटारे उघडली आहेत. तुम्ही सर्वजण याला उत्तरे देत आहेत.

विशेष म्हणजे मुंबईत आता गिधाडं फिरायला लागली आहेत. गिधाडांची लचके तोडणारी अवलाद फिरायला लागली आहेत. मुंबई भडकवायची आहे, मुंबई गिळायची आहे, तुम्ही गिळू देणार? लचके तोडू देणार? हे नवीन नाहीय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेकजण स्वराज्यावर चालून आले होते. त्या कुळातले आताचे शाह, अमित शाह देशाचे गृहमंत्री मुंबईत येवून गेले आणि काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इथे जमिनीतून ही फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजसुद्धा ठणकावून सांगतोय.

Image

एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गिधाड हा शब्द मुद्दामनू वापरला. कारण आज मुंबईत निवडणूक आली म्हणून मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकट येतात तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी स्क्वेअर फुटात विकण्यासारखी जमीन असेल पण आमच्यासाठी मातृभूमी आहे.

तुमचं बरंय की रिअल इस्टेट विकायला जमीन पाहिजे. पण ही फक्त जमीन नाहीय तर आमची मातृभूमी आहे.

मुंबादेवी ही आमची आई आहे. जो आमच्या मुंबाआईवर वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवार राहणार नाहीत. दुर्देवाने आईला गिळायला निघालेली माणसं आहेत. माणसं आहेत की जनावरं? ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला सगळी पदं दिली, मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्या आहेत. सुरत 232 किमी. अरे बापरे किती लांब जावं लागलं त्यांना? मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. कारण पुन्हा दसरा येतोय. पण मी आज मुंबई बद्दल बोलणार आहे.

Image

तुमचा आणि मुंबईचा संबंध नेमका काय? कमळाबाई आणि मुंबईचा संबंध नेमका काय? मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो कारण त्यांना मला जाणीव करुन द्यायची आहे की, म्हणे ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. पण कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलेला आहे. ही तीच शिवसेना आहे. बघा भरगच्च भरलेली आहे. हे बघितल्यानंतर पुन्हा मुंबईवर हक्क सांगण्याचं धाडस करु नका.

आमच्यावर वंशवाद-घराण्यावर टीका होते. कुटुंबियांवर टीका होते. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. ज्या मुंबईवर तुमची वाकडी नजर पडली आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनसंघ नव्हताच. त्या चळवळीत माझे आजोबा होते. चळवळीचं रण पेटला असताना निवडणुका आल्या आणि जनसंघाने एकी फोडली. हा इतिहास तुम्हाला माहिती हवा. त्यानंतर दुर्देवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. २५ वर्षे आमच्या राजकीय आयुष्यातील युतीमध्ये सडली. ते मी आज पुन्हा बोलतोय. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी घ्यायची आणि डोक्यावर हे राष्ट्रीय पक्ष बसणार. तुमचं कर्तृत्व काय होतं? करता-करता वरती पोहचलात काय आणि पोहचल्यानंतर आम्हाला लाथा मारायला आलात? आज मी तुमच्यासमोर आहे आणि आदित्य आहे. वंशवादावर टीका करणार असाल तर तुमचा वंश कोणता त्यावरच वाद आहे. कारण एवढे उपरे घेतले आहेत ते घेतल्यानंतर तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाहीय. कशाला नको तिकडे बोलत आहात. माझं म्हणणं काय मुद्द्याचं बोला, कामाचं बोला.

Image

म्हणे, 70 वर्षांनंतर देशात चित्ता आणला. काय जाहीराती झाल्या? दार उघडल्यानंतर चित्ता करतो म्याँव. आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले. चित्ता आणला ते चांगलंच केलं. आम्हीदेखील आणले पेंग्विन. सरकार असताना आम्ही निर्णय घेतले होते त्याला यांनी स्थगिती दिली. वरळीत आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्सालय झालंच पाहिजे. त्यासाठी मी संमती दिली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिथे इमारती केल्या तर काय करणार? धारावीत जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलं आहे ते झालं पाहिजे. लोकांना घरं बांधा. मुंबई संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या आर्थिक केंद्र शहरातून आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवता?

आज वेदांत गेला. त्याबद्दल ते धांदात खोटं बोलत आहेत. लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेवून तुम्ही बोलत आहात? एकत्र प्रोजेक्ट आणूयात.

एक-एक येणारे उद्योग हे निघून जात आहे आणि मिंदे गट नुसता शेळ्यासारखा होय महाराजा करत बसत आहेत. आज सुद्धा दिल्लीत गेलेत. दिल्लीज मुजरा आणि गल्लीत गोंधळ. ते मुजरा मारण्यासाठी दिल्लीत जातात. कितीवेळा झुकले असतील. पण महाराष्ट्राची बाजू दिल्लीत का सांगत नाहीत? सांगाना पंतप्रधानांना. वेदांताला केंद्राकडून भरघोस सवलती दिल्या जात आहेत. मग महाराष्ट्रात का सवलती दिल्या नाहीत.

मुंबईकर शिवसेनेवर का विश्वास टाकतात याचा कधी विचार केलाय? शिवसेना म्हटल्यावर आधार, विश्वास आणि विकास आहे. मुंबईत अनेक आपत्त्या आल्या प्रत्येक वेळी शिवसैनिक धावून जातो.

मी हॉस्पिटलला भेट देत असताना एक तरुण मुलगा व्हेंटिलेटरवर होता. चेहरा दिसत नव्हता. मला डॉक्टर उभे राहून सांगत होते की, हा मुलगा एक-दोन दिवसाचा सोबती आहे. मी त्याच्याजवळ गेलो सांगितलं, काही नाही तू दोन-तीन दिवसात बरा होशील. तो तरुण बरा झाला. असे अनेकजण बरे झाले, अशी माहिती ठाकरेंनी दिली.

Image

अमित शाहांना आव्हान

तुम्ही हिंदूंमध्ये मराठी-अमराठी असा भेदभाव करुन बघा. आज अमराठी जनतादेखील आमच्यासोबत आहे. गुजराती, उत्तर प्रदेशचे सगळे आहेत. कारण कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी सर्वांचे प्राण वाचवले आहेत. १९९२-९३ साली देखील देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. त्यावेळीदेखील शिवसैनिकांनी दर्ग्याचं देखील संरक्षण केलं आहे. हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची आणि माझ्या आजोबांची शिकवण आहे. केवळ मतं मिळवायची म्हणून नाही. कधीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत, असं म्हटलेलं नाही. शिवसेना आज म्हणजे काय, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय ते त्यांनादेखील समजत आहे. त्यामुळे अमराठी, गुजरातीसुद्धा आमच्यासोबत आहेत.  मराठीतर आहेतच. पण तुमची जी शाहानीती आहे यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तोडा फोडो राज्य करा ही निती महाराष्ट्रात शक्य नाही. हिंदू-मुसलमान भेदभाव शक्य नाही. म्हणून मी अमित शाहांना आव्हान देतोय. तुमचे चेले-चपाटे इथे बसले आहेत ना, त्यांना सांगा, हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणुका महिन्याभरात घेवून दाखवा. त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला विधानसभेची निवडणूक घेवून दाखवा. कुस्ती आम्हालासुद्धा येते. आमची तर तीच परंपरा आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर.