पत्राचाळ घोटाळ्यातील आरोप शरद पवारांनी फेटाळले:चौकशीची मागणी

‘आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’शरद पवार यांचा सवाल

मुंबई ,२१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-पत्रा चाळप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचे नाव आमदार अतुल भातखळकर यांनी घेतले होते. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल, असा सवाल शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Image

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी काल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या निकालाची माहिती आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गोळा केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १७३ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस पक्ष ८४, भाजप १६८ आणि शिंदे गटाला ४२ जागांवर विजय मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्यात, याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. मात्र, महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

यावेळी शरद पवार यांना भाजपदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करत असल्याबद्दल विचारण्यात आले. यावर पवार यांनी म्हटले की, आमच्याकडे असलेली अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगितली. आता दुसऱ्यांना ते सर्वाधिक जागा जिंकलेत या आनंदात राहायचे असेल तर राहू द्या, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली. त्यामुळे आता भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आज मुंबई मधील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्नांसंबंधी लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचे कारण राज्य सरकारने काही निर्णयात बदल केला किंवा नव्याने निर्णय घेतले. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोरोना काळात काही मुलं किंवा पालक मृत्युमुखी पडले. अशांना मदत करण्यासंबंधीचे धोरण मागील सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यामध्ये अडीच हजार रुपये इतके अनुदान जाहीर करण्यात आले असताना ते अनुदान स्थगित केल्याची माहिती आहे. यामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. पहिला प्रकार म्हणजे आई किंवा वडील यापैकी एकच व्यक्ती हयात आहे अशी जी मुले आहेत त्यांची संख्या वीस हजार आहे. ज्यांचे आई आणि वडील दोघांवरही मृत्यू ओढवला, अशा मुलांची संख्या ८०० आहे. मला स्वत:ला असे वाटते की सगळ्या बालकांकडे बघण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा आणि समंजसपणाचा असतो.अशाप्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या बाहेरही झाली. त्यामध्ये त्या त्या राज्य सरकारने त्यांना अनुदान दिले आहे. उत्तर प्रदेश चार हजार, कर्नाटक आणि उत्तराखंड ३५००, मध्यप्रदेश पाच हजार, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश अडीच हजार, तमिळनाडू तीन हजार, राजस्थान दोन हजार तर महाराष्ट्र १,१२५. यामध्ये वाढ करण्यासंबंधीचे धोरण मागील सरकारच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ती योजना किंवा तो निर्णय प्रत्यक्षपणाने कृतीमध्ये आला नाही. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अशा अडचणीतल्या कुटुंबीयांची अवस्था ही अधिक गंभीर आहे. याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे, असा माझा आग्रह आहे.

Image

पुढे त्यांनी पत्रा चाळ प्रकरणाबाबत भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाबाबत भूमिका मांडली. पवार म्हणाले, ज्या प्रकरणात माझे नाव घेतले जात आहे त्याबद्दलची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्या बैठकीचे मिनिट्स जाहीर केले आहेत. तरी देखील कोणीही माझी अथवा कोणाचीही चौकशीची मागणी केली तर त्या चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही. चौकशी जरूर करा. अगदी चार-आठ दिवसांत जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करा. ही चौकशी झाल्यानंतर ज्याप्रमाणे आव्हाड यांनी सांगितले की हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर आरोप करणाऱ्यांवर काय भूमिका घेणार याबाबतीत राज्य सरकारने जाहीर करावे, असे म्हणत पवार साहेबांनी राज्य सरकारला फैलावर घेतले.