हैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये बलिदानाची परंपरा नांदेड पासून सुरु -ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव

नांदेड ,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये जवळपास १०९ हुतात्म्यांचे बलिदान झालेले आहे. त्यामध्ये औरंगाबाद येथील १०,उस्मानाबाद येथील ११, बीड येथील २१,परभणी येथील ३० आणि नांदेड येथील ३७हुतात्म्यांचे बलिदान या मुक्ती संग्राम यामध्ये झालेले आहे. मराठवाड्यातील हुतात्म्यांची बलिदानाची परंपरा मोठी आहे.१८५७ च्या बंडात सहभागी आणिकळ्यापाण्याची जन्मठेप भोगलेले नांदेडचे रंगराव पागे नरखेडकर (यांचा नंतर अंदमानात १८६० ला मृत्यू झाला)आणि हुतात्मा जयवंतराव पाटील त्यांच्यापासून या महान त्यागाला प्रारंभ होतो. असे मत जेष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले. ते दि. २१ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यानामध्ये ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे सिंहावलोकन’ या विषयावर बोलत होते. 

यावेळी त्यांच्यासमवेत मंचावर अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंहबिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ.वैयजंता पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती. 

पुढे ते म्हणाले स्वामी रामानंद तीर्थानी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढ्यात बलिदान झालेल्या हुतात्म्यांची जाणीव ठेवून पुढे तेवत ठेवला म्हणून आज आपण या स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत. हैदराबाद मुक्ति संग्रामाचा हा इतिहास दर्दभरा होता. हा लढा जातीयवाद किंवा धर्मवाद्धाचाही नव्हता, तर हा लढा सत्तेचा आणि एकाधिकार शाहीचा होता. एका बाजूला आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो आणि दुसऱ्या बाजूला निजामाचे गुलाम होतो. निजामी पोलीस, निजामि लष्कर, रजाकार यांच्या हातून मारले गेलेले गोळीबारात ठार झालेले स्वतंत्र सैनिक. ज्यांनी जंगल सत्याग्रह केले, नाके लुटले, बँका लुटल्या, पोलीस ठाण्यावर हल्ले केले व त्यात ठार झालेले आपले हुतात्मे अशा बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण या निमित्ताने आपण केले पाहिजे. इतिहासात एक विलक्षण सामर्थ्य आहे. इतिहासाने वीस्टीलेला भूतकाळ प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या वर्तमानाला चैतन्याचा खळाळ अविरतपणे पुरवू शकतो. विवेक आणि संयम बाळगला तर चैतन्याचा खळाळ केवळ आनंदमय आणि उद्भोधक ठरतो. एवढेच नव्हे तर भविष्याच्या अदृश्य वाटाही प्रकाशमय करू शकतो.  

यावेळी युवकांना उद्देशून भालेराव पुढे म्हणाले युवकांनो लक्षात ठेवा जुलूम आणि अन्याय याचा प्रतिकार करणे हीच ईश्वर भक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आव्हान देत आहे. काहीतरी करण्याची हाक देत आहे. जगभराच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आताच्या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हकेला कृतीने ओ द्या, आणि हे ध्यानात ठेवा की विद्यमान परिस्थितीचे मूळ राजकीय प्रश्नात आहे. इतरत्र त्याचा शोध घेवू नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा, अर्धवट सुटलेले सूत्र तुम्ही आपल्या हाती घ्या, असे आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. 

अध्यक्षीय समारोपमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले म्हणाले की, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास निशिकांत भालेराव यांनी विस्तृतपणे मांडला. जो आमच्यापैकी बऱ्याच जणांना पूर्णपणे माहीत नव्हता. यावर विद्यार्थ्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामावर विशेष अभ्यास करून पुढील पिढीला तो ज्ञात करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. सर्वप्रथम प.पु. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस चंदनहार अर्पण केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप काळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.