वैजापूर तालुक्यात लंपीची लागण झालेल्या जनावरांच्या लसीकरणाला वेग:आतापर्यंत 1600 जनावरांना लसीकरण

लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता

मुंबई,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही – सचिन्द्र प्रताप सिंह
पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

श्री सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाजमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी.

लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४(१) नुसार जनावरात या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संबंधित माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गावस्तरावरून अशी माहिती संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात आले आहे.

लम्पी हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. सध्या या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र त्यांनी लम्पी रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.

राज्यामध्ये दि. २० सप्टेंबर, २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर हिंगोली व रायगड अशा २७ जिल्ह्यांमधील एकूण १२२९ गावांमध्ये फक्त ११,२५१ जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यापैकी ३८५५ जनावरे उपचाराच्या माध्यमातून रोगमुक्त झाली आहेत.

उर्वरित बाधितांसाठी लसदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २० रोजी २५ लाख लस मात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगाव १२२, अहमदनगर ३३, धुळे १२, अकोला ५४, पुणे २५, लातूर ५, औरंगाबाद ८, सातारा १५, बुलडाणा २५, अमरावती २९, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम ४, जालना २, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १ अशा ३५२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

दि. २० रोजी रोग प्रादुर्भावग्रस्त ८ जिल्ह्यामधील गंभीर जनावरांवर उपचार व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील भीषकशास्त्रातील तज्ज्ञांची १९ पथके नियुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ दररोज सायं ४ ते ५ दरम्यान दृकश्राव्य माध्यमांद्वारे अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांबाबत मार्गदर्शन व उपचारामध्ये मदत करीत आहेत.

वैजापूर तालुक्यात लंपीची लागण झालेल्या जनावरांच्या लसीकरणाला वेग

वैजापूर,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात लंम्पी त्वचा रोगाने आता शिरकाव केला असून चार जनावरांना त्याची लागण झाली आहे. लागण झालेल्यांमध्ये गायीसह वासराचा समावेश आहे. दरम्यान वैजापूर शहर व परिसरातील एकूण नऊ जनावरांना लंम्पीची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्या रक्ताचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता यापैकी दोन जनावरे पाॅझिटिव्ह निघाली. याशिवाय तालुक्यातील चिंचडगाव व चांडगाव येथेही दोन जनावरे पाॅझिटिव्ह निघाली आहे.  या पार्श्वभूमीवर तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयासह पंचायत समिती कार्यालयातर्गंत येणाऱ्या दवाखान्यांच्या माध्यमातून जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.वैजापूर शहर परिसरात आतापर्यंत 1600 जनावरांना लसीकरण करण्यात आले.    

जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी जनावरांना या रोगाची लागण झाली असून लंम्पीने थैमान घातले आहे. लंम्पीचे लोन आता वैजापूर तालुक्यातही पसरायला सुरवात झाली आहे. वैजापूर शहरासह परिसरातील वैजापूर ग्रामीण व रोटेगाव येथील एकूण नऊ जनावरांना लंम्पीची लक्षणे दिसून आल्याने येथील तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व  चिकित्सालयाच्यावतीने या जनावरांच्या रक्ताचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी शहरातील एका गायीसह वासरू लंम्पी पॉझिटीव्ह आढळून आले तर अन्य सात जनावरांमध्ये त्याची लागण झाली नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तसेच तालुक्यातील चिंचडगाव व चांडगाव येथेही दोन जनावरांना लागण झाली आहे.  परंतु असे असले तरी त्या जनावरांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे. पाॅझिटिव्ह जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयास एकूण 2600 लसी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी 1600 जनावरांना लसीकरण करण्यात आले. या कार्यालयातर्गंत शहर परिसरातील जवळपास पाच हजार जनावरे आहेत. येत्या काही दिवसांत सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येईल. असा विश्वास सहआयुक्त एन. बी.  बाभुळगावकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान तालुक्यात लहानमोठी ७५ हजार ७५० जनावरे आहेत. पैकी अद्यापपर्यँत 1600 जनावरांचे लसीकरण झाले आहे.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लंम्पीचा तालुक्यात अद्याप पाहिजे त्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला नाही. परंतु असे असले या रोगावर मात करण्यासाठी आमचा ताफा सज्ज आहे. 
मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान लंम्पीने तालुक्यात शिरकाव केल्यामुळे तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयासह पंचायत समिती कार्यालयातर्गंत येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अधिकाऱ्यांना खासगी मनुष्यबळाचा टेकू घेण्याची वेळ आली आहे.  तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था दयनीय असून ते मोडकळीस आले आहेत. रिक्त जागांबरोबरच संबंधित अधिकारी व कर्मचारी दवाखान्यात थांबत नाही. त्यामुळे लंम्पीला तोंड देणे. पशुपालकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

लसीकरण सध्या युध्दपातळीवर
वैजापूर शहर परिसरात आतापर्यंत चार जनावरे पाॅझिटिव्ह निघाली. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 1600 जनावरांना लसीकरण करण्यात आले. आम्हाला एकूण 2600 लसी प्राप्त झाल्या होत्या. लसीकरण सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळुन आल्यास त्यांनी लगतच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी तातडीने संपर्क कराव असे आवाहन पशुसंवर्धन सहआयुक्त एन. बी. बाभुळगावकर यांनी केले आहे.