वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या तिघा आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी पाच हजार रुपये दंड

औरंगाबाद,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वाहतूकीचे नियम मोडून वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या  तिघा आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी ठोठावली.मुजफर गुलाम सादी कुरेशी (२०), वाजीद हनिफ कुरेशी (२०) आणि शाहरुख चॉंद कुरेशी (२०, सर्व रा. सिल्लीखाना) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात तत्कालीन वाहतूक शाखेचे जमादार गोकुळ साहेबराव चेळेकर (२९) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २८ जुलै २०१६ रोजी फिर्यादी व त्‍यांचे सहकारी दुपारी सव्‍वा बारा वाजेच्‍या सुमारास सिल्लीखाना सिग्नलवर कर्तव्‍यावर होते. त्‍यावेळी बीएसएनएल कार्यालयाकडून सिल्लीखान्‍याकडे जाणाऱ्या  रस्‍ताने सुरु असेलेला सिग्नल तोडून विनाक्रमांकाच्‍या दुचाकीवर तिघेजण विना हेल्मेट जात होते. फिर्यादी व त्‍यांच्‍या सहकार्याने त्‍यांना थांबवून त्‍यांच्‍याकडे चौकशी केली असता ते तिघे त्‍यांच्‍या अंगावर धावून आले. आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादीसह त्‍यांच्‍या सहाकाऱ्याला माराहण केली.या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३५३, ३३२ आणि मोटार वाहनकायद्याच्‍या विविध कलमा अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्‍याच्‍या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार बी.बी. कोलते यांनी काम पाहिले.