ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर:राज्यात भाजप, राष्ट्रवादीची सरशी, काँग्रेसची पिछेहाट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र असून भाजपनेही अनेक ठिकाणी मुसंडी मारली आहे.

राज्यात रविवारी १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सरशीमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे दिसून आले.

पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिंदे गटानेही काही ठिकाणी विजय मिळवला आहे. तर स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबिज केली आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये बाजी मारल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये एकूण ८८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. त्यानंतर शिवसेनेने १३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपकडे पाच तर काँग्रेसकडे चार ग्रामपंचायती गेल्या आहेत.

पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे ३० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर प्रमुख विरोधक भाजपला केवळ तीन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तर स्थानिक आघाड्यांनी २३ ठिकाणी सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरपंचपदासाठीदेखील राष्ट्रवादीने ३० ठिकाणी विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून ७० पैकी ३३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या हाती आल्या आहेत.
जळगावात शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे पाहावयास मिळाले. भाजप आणि काँग्रेसला १३ पैकी एकाही जागेवर सत्ता मिळाली नाही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील ११ तर यावल तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत २० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपने १६ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकमेव कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली.

धुळ्यात कमळ फुलले

धुळ्यात ३२ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. धुळे जिल्ह्यात भाजपने ३३ पैकी ३२ जागांवर कमळ फुलविले आहे. तर फक्त राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

नंदुरबारमध्ये भाजपचे वर्चस्व

नंदुरबारमध्ये भाजपने बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये झालेल्या ७५ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. तर शिवसेना (शिंदेगट) २८, अपक्ष ४ व राष्ट्रवादी १ आणि लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांना सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी ५८१ च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच २५९ ठिकाणी निवडून आले आहेत व या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरपंच ४० ठिकाणी निवडून आले आहेत. दोन्हीचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, जनतेतून थेट निवडून दिलेला सरपंच हा संपूर्ण गावाला उत्तरदायी असतो. त्या दृष्टीने शिंदे फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरही जनतेने या निकालाद्वारे शिक्कामोर्तब केले आहे.