वैजापूर तालुक्यात किसान सन्मान योजनेतील 69 हजार शेतकऱ्यांचा डाटा अपडेट

वैजापूर,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात महसूल विभागातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा डेटा ऑनलाइन अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.73 हजार 961 पात्र शेतकऱ्यांपैकी 69 हजार 232 शेतकऱ्यांचा डेटा ऑनलाइन अपलोड करण्यात आला आहे. दोन गावांतील शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्याचे काम प्रलंबित आहे.
2019 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरू केली असून या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा अपात्र शेतकरीही  लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार महसूल विभागाने लाभार्थी शेतकऱ्यांचा डेटा गोळा करून तो ऑनलाइन करण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दिली होती. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी, तलाठी व डेटा ऑपरेटर यांनी किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांचा डेटा अपडेट करण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण केले आले आहे. तालुक्यातील 166 गांवातील 73 हजार 961 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 164 गावांतील 69 हजार 232 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे. दोन गावातील पात्र शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचे काम अपूर्ण आहे.