वैजापूर भूमी अभिलेख कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट

वैजापूर,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- भूमी अभिलेख कार्यालयात असलेली शेतजमीन, प्लॉट मालमत्तेसंदर्भातील कामे लवकर करून देणाऱ्या दलालांचा कार्यालय परिसरात सुळसुळाट झाला आहे. शेती, प्लॉटची मोजणी करण्यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालय परिसरात दलालांची टोळीच निर्माण झाली आहे. आश्चर्य म्हणजे शासनाची फी भरूनही सहा-सहा महीने काम होत नाही.तेच काम दलालांची टोळी आठ दिवसात करून दाखवतात. त्यामुळे हे कार्यालय जणू काही दलालच चालवत आहेत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील क्लिष्ट कार्यप्रणालीमुळे सामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयात नव्याने जाणारा व्यक्ती गोंधळून जातो. या ठिकाणी कुणीही दलाल कार्यरत नाही अशा सूचना लावलेल्या आहेत. परंतू कार्यालयाच्या फाटका पासून ते कार्यालयात जाईपर्यंत परिसरात अनेक दलाल भेटतात. कार्यालयातील कामकाज आपल्यामार्फतच व्हावे, म्हणून या दलालांनी एक प्रकारे रॅकेटच बनवले आहे. त्या टोळीत एजंट, नंतर काही कर्मचारी व अधिकारी सुद्धा सक्रिय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण सामान्य माणसाचे कोणतेही काम या दलालांशिवाय पूर्णच होत नसल्याचे चित्र आहे.तालुक्यात शेतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच वडिलोपार्जित शेतीची जपणूकही केली जात आहे. शेती घेणारे अनेकजण असले तरी विक्री क्वचित करीत आहेत. त्यामुळे शेतीच्या किमती लाखोंच्या घरात गेल्या आहेत. शेतीलाही महत्त्व आले आहे. बांधावरून होणारे वादटाळण्यासाठी प्रत्येकजण शेतीची मोजणी करून हद्द कायम करण्याला प्राधान्य देत आहेत.
असा आहे दलालांचा फंडा…
भूमी अभिलेख कार्यालयांत हेलपाटे मारून कंटाळलेल्या शेतकऱ्यांची या दलालांकडून आरामात शिकार केली जाते.या दलालांवर या कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असतो. मात्र, या दलालांमार्फत अडलेली सर्व कामे होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. दलालांच्या हाती फाइल सोपवली की पोटहिश्शाचीही मोजणी होते. नकाशाही मिळतो. त्यासाठी बऱ्याचदा खासगी सर्व्हेअरची मदत घेतली जाते. अशा नकाशावर शासकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरीही नसते. सर्व्हेअरच स्वाक्षरी करून मोकळे होतात.