उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्का! महाराष्ट्राबाहेरील पक्षप्रमुख शिंदे गटात

मुंबई ,१५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत, शिवसेनेत उठाव करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिल्लक सेनेला जोरदार धक्के देणे चालूच ठेवले आहे. या सगळ्या धक्क्यांमधून शिल्लकसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहते की काय अशी परिस्थिती लवकरच ओढवणार आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक शिंदे गटाकडे जात असताना आता, राज्याबाहेरील शिवसैनिकांनीही शिंदे गटाचाच मार्ग पत्करला आहे. तब्बल ८ राज्यातील शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

May be an image of 14 people, people sitting, people standing and indoor


 
 
दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, मणिपूर, छत्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यांतील शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आयात या राज्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही शिंदे गटात गेले आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना शिवसेनेच्या विश्वप्रवक्त्यांना उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असल्याची स्वप्ने पडत होती पण आता ते स्वप्न धुळीस मिळाले आहे.

शिवसेनेच्या विविध राज्यातील प्रदेश प्रमुखांनी बुधवारी भेट घेत या सर्वांनी शिंदे गटाला आपला पाठींबा जाहीर केला. यासमयी झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष संघटना देशातील कानाकोपऱ्यात वाढवण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.

May be an image of 10 people, people sitting, people standing, office, indoor and text that says "राष्ट्र शासन व्यमंत्री"

यामध्ये दिल्ली शिवसेना प्रदेश प्रमुख संदीप चौधरी, मणिपूर प्रदेश प्रमुख टोंबी सिंह, मध्य प्रदेश राज्य प्रमुख ठाडेश्वर महावर, छत्तीसगड प्रदेश प्रमुख धनंजय परिहार, गुजरात प्रदेश प्रमुख एस.आर.पाटील, राजस्थान प्रदेश प्रमुख लखनसिंह पवार, हैदराबाद प्रदेश प्रमुख मुरारी अण्णा, गोवा प्रदेश प्रमुख जितेश कामत, कर्नाटक प्रदेश प्रमुख कुमार ए हकारी, पश्चिम_बंगाल प्रदेश प्रमुख शांती दत्ता, ओडिशा प्रदेश प्रभारी ज्योतीश्री प्रसन्न कुमार आणि त्रिपुरा राज्याचे प्रदेश प्रभारी बरीवदेव नाथ अशा एकूण १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांचा समावेश होता. या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले. याप्रसंगी कॅप्टन अभिजित अडसूळ हेदेखील उपस्थित होते.