वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला – पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आश्वासन

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावर एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन

मुंबई ,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास दीड लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या आहेत. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल रात्रीच्या सुमारास फोन केला. त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधत ‘वेदांता’ ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली. तसेच आगामी काळातले मोठे उद्योग आणि प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे, आपण ते सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेली.

मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार!
 
 
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर खापर फोडलं…

महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? विरोधकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचं सरकार येऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल आणि फॉक्सकॉनसोबत एक बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीत सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील, असं मी त्यांना सांगितलं. पुण्यातील तळेगावजवळील ११०० एकर जमीन तसेच ३० ते ३५ हजार कोटींच्या सवलतीसह अनुदान तसेच अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफरही करण्यात आल्या होत्या. म्हणजेच सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या”.

फॉक्सकॉन गुजरातला का नेला? वेदांताच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर!

मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोपही सुरु असताना यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
  
“सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की, हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडंट एजन्सीनं असं ठरवलं की, गुजरात असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी सर्वात पहिले सुरू केली.” असे अग्रवाल यांनी सांगितले.