चिरागीच्‍या पैशांवरुन झालेल्या वादातून वृध्‍दाचा चाकू भोसकून खून करणाऱ्या पुतण्‍यासह त्‍याच्‍या मित्राला जन्‍मठेप

औरंगाबाद,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-दर्ग्याच्‍या देखभालीसाठी मिळणार्या चिरागीच्‍या (दान) पैशांवरुन झालेल्या वादातून वृध्‍दाचा चाकू भोसकून खून करणाऱ्या पुतण्‍यासह त्‍याच्‍या मित्राला जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. ओझा यांनी सोमवारी दि.१२ दिले. सैफोद्दीन उर्फ राजा नुरोद्दीन शेख (२०) आणि आसीफ सिध्दीकी कुरेशी (१९, दोघे रा़ निजामोद्दीन रोड, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत़
या प्रकरणात मयत शेख युसूफोद्दीन शेख शमोद्दीन (७३) यांची पत्‍नी जुबेदा युसूफोद्दीन शेख (५५, रा. मोमीनपुरा, दौलताबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, त्‍यांचे कुटूंब वंशपंरपरागत दौलताबाद येथील मोमीन आरिफ दर्ग्याची देखभाल करतात. त्‍यापोटी त्‍यांना चिरागी देण्‍यात येते. या चिरागीवरुन आरोपी व फिर्यादीच्‍या कुटुंबामध्ये  वाद सुरु होते. दरम्यान आरोपी सैफोद्दीन याच्‍या वडीलांच्‍या खून झाला, मयत युसूफोद्दीन याच्‍यावर खूनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. मात्र न्‍यायालयाने खूनाच्‍या गुन्‍ह्यातून मयत युसूफोद्दीन यांची निर्दोष मुक्तता केली होती. याचा राग मनात असतानाच चिरागी वरुन आरोपी हा मयताच्‍या कुटूंबाशी नेहमी वाद घालत होता. दरम्यान १३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी चार वाजेच आरोपी सैफुद्दीन व त्‍याचा भाऊ अझरोद्दीन हे मयताच्‍या घरी गेले होते. त्‍यावेळी त्‍यांनी चिरागीच्‍या हिस्‍याबाबत वाद घातला असता, चिरागीचे प्रकरण न्‍यायालयात सुरु आहे, त्‍याचा जो निर्णय होईल त्‍या प्रमाणे वाटणी करु असे मयाताने सांगितले.

अन चाकुने वार करुन केला खून

१४ फेबु्रवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी सैफोद्दीन व त्‍याचा मित्र आसीफ हे फिर्यादीच्‍या घरी गेले होते़, चिरागीच्‍या कारणावरुन वाद घालत सैफोद्दीन याने हा म्हातारा जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत चिरागी मध्ये हिस्‍सा मिळणार नाही, याला मारुन टाकून असे म्हणुन त्‍याने आणलेला चाकू मयत युसूफोद्दीन यांच्‍या बरगडीत भोसकला तर त्‍याच्‍या मित्राने देखील युसूफोद्दीनवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. उपचार सुरु असतांना डॉक्टरांच्‍या समक्ष तपास अधिकाऱ्यानी युसूफोद्दीन यांचा मृत्‍युपूर्व जबाब नोंदवला. उपचारसुरु असतांना त्‍यांचा मृत्‍यु झाला.या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा आरोपींना जन्‍मठेप

या प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात फिर्यादीसह जबाब घेणारे तपास अधिकारी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी एक हजाररुपये, तसेच कलम ३०७ अन्‍वये दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.