मुंबईत सेना- शिंदे गट भिडले; २५ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर आज मध्यरात्री दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. दादर पोलिसांनी विभागप्रमुख महेश सावंतसह २५ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना मारहाण झाली होती. तेलवणे यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत यांनीदेखील स्टॉल लावला होता. विसर्जनाच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाद झाला होता. त्यावेळी हा मिटवला. मात्र, महेश सावंत यांचा राग असल्याने त्यांनी रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह २० ते २५ कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह आले असल्याचे संतोष तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महेश सावंत यांनी शिविगाळ केली आणि अंगावर धावून आले. सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या दरम्यान पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याची चैन पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली असल्याची तक्रार तेलवणे यांनी केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, यशवंत विचले यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.