वैमानिक विंग कमांडर दीपक साठे यांच्या कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन

नागपूर, दि. ८ : कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे  सांत्वन केले व धीर दिला.

वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगवेळी धावपट्टीवरुन अचानक घसरल्यानंतर दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि ‘राष्ट्रपती पदका’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा साठे, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय साठे, शांतनू साठे, स्नुषा वैभवी शांतनू साठे तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

आज त्यांच्या आईचा जन्मदिवस असून मुलाच्या अपघाती मृत्यूचे धक्कादायक वृत्त त्यांना आजच कळले. टेबलटॉपसारखी रचना असलेल्या एअरपोर्टवर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई तसेच नातेवाईकांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *