जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबविण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

अकोला,​८​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना असून हे लसीकरण युद्धपातळीवर राबवावे, असे निर्देश राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी, असे निर्देश ना. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

लम्पि चर्मरोग या जनावरांमधील संसर्गजन्य आजारासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज अकोला जिल्ह्यात आले होते. त्यांनी सकाळी निपाणा व पैलपाडा या गावांमध्ये भेट देऊन बाधित पशूंची पाहणी केली. पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,   स्नातकोत्तर पशुवैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिघे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे,  बुलडाणा- वाशीमचे उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर, पशुधन विकास अधिकारी  डॉ. विनोद वानखडे, डॉ. लोणे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यक अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत सादर करण्यात आलेली माहितीः

लम्पि चर्मरोग संदर्भात दि.१८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात पवन श्रीराम नाचोने यांच्याकडील बैलास सर्वप्रथम लक्षणे आढळून आली. त्यानंतर नमुने पाठविण्यात आले. अहवाल सकारात्मक आल्यानंतर लगेचच दि.२५ ऑगस्ट पासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ लक्ष ८३ हजार ६८ पशुधन असून त्यात २ लाख ३३ हजार २७१ गायवर्गीय असून ४९ हजार ७९७ म्हैस वर्गीय आहेत. लम्पि चर्मरोगग्रस्त जनावरांची संख्या ४९२ आहे. त्यात १६० गायी, ३३० बैल आहेत तर दोन म्हशींनाही लागण झाली आहे. बाधित जनावरे असलेल्या गावांतील जनावरांची संख्या एकूण ५६ हजार ४१० इतकी आहे. त्यात आतापर्यंत उपचारानंतर ३३७ जनावरे पूर्ण बरी झाली आहेत. तर ३६ हजार ७६६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत १५५ जनावरांवर उपचार सुरु आहेत. बाधित गावे व बाधित गावांच्या पाच किमी त्रिज्येतील बाधित तसेच अबाधित जनावरांचे लसीकरण, गोचीड गोमाशा निर्मूलन, गोठ्यांचे निर्जंतुकीकरण इ. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ना. राधाकृष्ण विखे पाटील  म्हणाले की, बाधित जनावरांचा उपचार व अबाधित जनावरांचे लसीकरण शासनातर्फे मोफत करण्यात येत आहे.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पशुचिकित्सालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांचा व अन्य औषधोपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर राबविणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय पशुवैद्यकांना मदतीसाठी खाजगी पशुवैद्यकांनी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व खाजगी पशुवैद्यकांच्या सेवा घ्याव्या. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातल्या यंत्रणा आणि पशुपालक शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण या संसर्गजन्य आजाराच्या साथीतून आपले पशुधन सुरक्षित ठेवू, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या व अशा अन्य साथीच्या आजारांसाठी पशुविज्ञान विद्यापीठे व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्त पणे उपाययोजना राबवाव्या. राज्य शासनाच्या प्रयोगशाळांचा आणि विद्यापीठांतील प्रयोगशाळांचा समन्वय साधून त्या योगे अधिक संशोधन करावे व पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत उपस्थित आ. हरिष पिंपळे व आ. प्रकाश भारसाकळे यांनीही महत्वाच्या सुचना केल्या. त्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकांची रिक्तपदे भरणे,लसीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, जनावर दगावल्यास शेतकऱ्यास मदत मिळवून देणे आदी मुद्यांचा समावेश होता.  या बैठकीत त्यांनी अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेतला.

प्रादुर्भाव रोखण्यात यश, सतर्कता मात्र कायम – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबविण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी शासन सतर्क असून जनावरांचे लसीकरण करण्यास शासन प्राधान्य देत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील आढावा बैठकीनंतर ना. विखे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांचे समवेत विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार आदी उपस्थित होते.

राज्यात या आजाराचा शिरकाव हा गुजरात व राजस्थान या राज्यातून झाला. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी  लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.  सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत.  संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आली आहे, अशी माहिती ना. विखे पाटील यांनी दिली.

राज्यात पशुवैद्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी  प्रयत्न सुरु आहेत. तथापि तातडीची स्थिती पाहता खाजगी पशुवैद्यकांची  लसीकरणासाठी मदत घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील पशुविज्ञान विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळा यांनी शासकीय प्रयोगशाळांशी समन्वय राखावा. लसीकरण व उपचारासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सने बाहेर पडावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आजारात जनावरे दगावण्याचे प्रमाण नगण्य असले तरी जनावर दगावल्यास पशुपालकास मदत देण्याबाबतची बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू,असे आश्वासनही त्यांनी दिले.