वैजापूर तालुक्यातील 14 गावांतील केवळ 3500 हेक्टर पिके बाधित ; प्रशासनाचा जावई शोध

गारपीटीमुळे नुकसान झालेल्यांनाच मिळणार भरपाई

वैजापूर,​८​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिप पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वास्तविक पाहता तालुक्यातील 40 पेक्षा जास्त गावांना तडाखा बसलेला असताना प्रशासनाने तालुक्यातील केवळ 14 गावांतील तीन हजार 480 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना 33 टक्क्यांपेक्षा जास्त तडाखा बसल्याचा जावईशोध लावला आहे. त्यामुळे तालुक्यातील अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच भरपाई मिळणार आहे. 

3 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यात झालेला वादळी पावसासह गारपिटीमुळे खरिप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. बहुतांश ठिकाणी पावासापेक्षा वादळाच्या चपाट्यात सापडून पिक भुईसपाट झाली. वादळामुळे जवळपास 43 गावातील पिकांना कमी – अधिक प्रमाणात बसल्याचे समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसिलदार राहुल गायकवाड यांच्यासह प्रभारी गटविकास अधिकारी हणमंत बोयनर, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी 14 गावांनाच गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. गारपीट व वादळी पावसाची ‘याची देही याची डोळा’ अशी तोंडी माहिती बहुतेक सज्जेच्या तलाठ्यांनी 24 तासांच्या आत प्रशासनापर्यँत पोहचवली.

या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने येथील पंचायत समितीच्या सभागृहात  सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत जायमोक्यावर जाऊन नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करा असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील 14 गावातील पाच हजार 222 शेतकऱ्यांच्या तीन हजार 480 हेक्टर जिरायती क्षेत्रावरील 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान तर एवढ्याच गावातील सात हजार 662 शेतकऱ्यांच्या पाच हजार 316 हेक्टर जिरायती क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान माहिती सादर करण्यात आली. दरम्यान 3 सप्टेंबर रोजी रात्री पाऊस झाला. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी तलाठ्यांची बैठक बोलावून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

6 सप्टेंबर रोजी लगेच प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त गावांच्या प्राथमिक यादीला नेमक्या कुठल्या आधारावर अंतिम स्वरूप देण्यात आले? ही 14 गावे वगळता अन्य गावात पिकांचे नुकसान झालेच नाही का? नुकसान झाले असेल तर ते शेतकरी नुकसानभरपाईस पात्र नाहीत का? नुकसान झालेला असतानाही त्यांना मदत नाही मिळाली तर त्यांनी कुणाकडे दाद मागायची? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपीटीमुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशाच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या टक्केवारीच्या आत ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली जाणार असल्याचे स्पष्ट होते. 

गारपीट व  पावसामुळे  नुकसानग्रस्त प्राथमिक अहवालातील गावांची नावे अशी :
१) भग्गाव,  २)सुराळा ,३)खंबाळा, ४)किरतपूर, ५)लाडगाव, ६)गोयगाव, ७)फकिराबादवाडी, ८)वैजापूर ग्रामीण, ९)डवाळा, १०)सिद्धापूरवाडी/म्हस्की,

११)भिंगी, १२)पानगव्हाण, १३)आघूर, १४)बोरसर.