दिल्लीत शरद पवार-नितीश कुमार यांची भेट!

नवी दिल्ली,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी (७ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दुपारी साडेतीनच्या सुमारास ६-जनपथ या शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. सोमवारपासून नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. २०२४ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बिहारमध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांनी राजदशी घरोबा केला. सत्ता मिळवल्यानंतर दिल्ली दौऱ्यात राहुल गांधींच्या भेटीला आलेल्या नितीश कुमारांनी ‘मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही’, असे स्पष्टीकरण दिले होते. यामुळे विरोधकांच्या संभाव्य आघाडीच्या समोरचा गोंधळ अजून वाढल्याने २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार हे विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील हे स्पष्ट होते.

Sharad Pawar Nitish Kumar

मात्र ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनीही पंतप्रधान पदाच्या उमेदवारीतून माघार घेतली होती. “माझे वय आता ८२ झाले असल्याने पंतप्रधान पदाची जबाबदारी मी स्विकारणार नाही, केवळ माझ्याकडे सर्व सुत्रे असावीत. त्यामुळे भविष्यात देशातील सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही.” अशी स्पष्टोक्ती त्यांनी तेव्हा दिली होती. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शरद पवार-नितीश कुमार यांच्यात राजकीयदृष्ट्या खलबतं झाली का? अशी चर्चा सध्या होत आहे.