औरंगाबादेत लोकसहभागातून होणार संपूर्ण शहराची वृक्ष गणना

औरंगाबाद फर्स्ट, महापालिका, स्मार्ट सिटी, प्रयास फाउंडेशन आणि एमजीएमचा उपक्रम

एमजीएमचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून करणार वृक्षगणना

औरंगाबाद,७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- येथील औरंगाबाद फर्स्ट च्या संकल्पनेतून औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, प्रयास युथ फाऊंडेशन आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरातील वृक्ष गणना अभियान राबविले जाणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, अशी माहिती औरंगाबाद फर्स्ट चे अध्यक्ष रणजीत कक्कड यांनी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष ​ मानसिंग पवार, कोषाध्यक्ष  अनिल माळी, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, निखिल भालेराव, ललित जाधव, स्मार्ट सिटी तर्फे आदित्य तिवारी, अर्पिता शरद,ऋषिकेश डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री कक्कड म्हणाले की, आज निळ्या आकाशासाठी जागतिक स्वच्छ हवा दिन सगळीकडे साजरा होतो. चांगला निसर्ग आणि स्वच्छ हवा हा सगळ्यांचा हक्क आणि अधिकार आहे. मात्र यासाठी निसर्गाचे ही संतुलन राखणे ही आपली जबाबदारी आहे. आज औरंगाबाद शहरात नेमके किती झाडे आहेत हे अज्ञात आहे. हे माहीत करून घेणे आज घडीला अत्यंत महत्त्वाच्या आहे. माझ्यामते शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्या नक्कीच कमी आहे. वृक्षांची संख्या कमी असणे म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडणे होय. औरंगाबाद शहराचा समतोल राखायचा असेल तर शहरात किती झाडे आहेत ही नेमकी आकडेवारी समजल्यानंतर त्यात आणखी किती भर घालण्याची आवश्यकता आहे हे लक्षात येईल. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षरोपण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे औरंगाबाद मध्ये कोणत्या वंशाची कोणते झाडे कुठे आहेत किती आहेत हेही लक्षात येईल. लोकसहभागातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच वृक्ष गणना होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यापुढे जाऊन स्मार्ट सिटीच्या सहकार्याने औरंगाबाद फर्स्ट ने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक तयार केले आहे. या ॲपद्वारे वृक्ष गणना करणे अधिक सोयीस्कर होणार आहे आणि वेगवानही होणार आहे. त्याकरिता वर उल्लेख केलेल्या सर्व संस्थांचे तसेच औरंगाबाद व्यापारी महासंघ, पेंट उत्पादक संघटना यांचे सहकार्य लाभले आहे. या अभियानासाठी औरंगाबाद शहरातील नागरिकांनी, संस्थांनी आणि व्यावसायिक प्रतिष्ठान आणि सहकार्य करावे.
एमजीएम चे विद्यार्थी करतील वृक्ष गणना
आतापर्यंत भारतात कुठेही विद्यार्थ्यांनी वृक्ष गणना केलेली नाही. त्यासाठी मोठ मोठ्या संस्था कार्यरत असतात. पहिल्यांदा सर्व स्थानिक संस्था यांच्या पुढाकाराने विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून वृक्षगणना करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच पर्यावरणाची होणारी हानी समजण्यास मदत होणार आहे. यामध्ये 300 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यासाठी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी विशेष प्रोत्साहन दिले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुटसुटीत ॲप
शहरातील वृक्ष गणना करण्यासाठी शहरातीलच तरुण ऋषिकेश डोणगावकर याने औरंगाबाद ट्री सेन्सस नावाने एप्लीकेशन तयार केले. या ॲपद्वारे जिओ टॅग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एखादे झाड नेमके कुठे आहे याचा शोध घेणे सोपे होईल. ज्या ठिकाणी डॅशबोर्ड वर खाजगी आणि शासकीय जागेवर असलेल्या झाडांची माहिती तात्काळ मिळेल. त्याचप्रमाणे त्या झाडाचे नाव, खोडाचा आकार, झाडाची स्थिती, ठिकाण, उंची या सर्वांची माहिती मिळणार आहे. ही सर्व माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सर्वरला जमा होईल.