वैजापुरात लोककला महोत्सव व राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

वैजापूर,६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-
महाकवी वामन दादा कर्डक यांची 100 वी जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची102 व्या जयंती निमित्त लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा वैजापूर व सावित्रीबाई फुले बहुउदेशीय सेवाभावी संस्था वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील धुमाळ मंगल कार्यालयात मंगळवारी राज्यस्तरीय लोककला महोत्सव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ मंच अध्यक्ष विष्णूअण्णा शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, एकनाथ त्रिभुवन, श्री शिंदे, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, रवींद्रअप्पा साखरे, प्रकाश बोथरा, आबासाहेब जेजुरकर, शाहीर अशोक बागुल, साहेबराव पाटील औताडे, अशोक धसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, जयवंतराव गायकवाड, विजय कोळगे (औरंगाबाद), गायकवाड (वाशिम), साहेबराव पडवळ, विलास म्हस्के, अण्णासाहेब ठेंगडे, दिलीप अनर्थे, सुनील त्रिभुवन, राजेंद्र बागुल, जगन गायकवाड, सुधाकर बागुल, सिताराम मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रास्ताविक अशोक बागुल यांनी केले तर सूत्र संचलन प्रमोद पठारे यांनी केले. राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे जवळ पास दीडशे कार्यकर्त्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. यात साहित्यिक, पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक,अंधश्रद्धा निर्मूलन, कृषी क्षेत्र, नाट्य कलावंत, वैद्यकीय व गायन नृत्य क्षेत्रातील सेवकांना स्मृती चिन्ह,शाल व प्रमाण पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, सायंकाळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी व गायकांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला.