शैक्षणिक धोरण केवळ एक धोरणात्मक दस्तऐवज नाही, तर भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज ए. एम.नाईक शाळेचे उद्घाटन

Image

मुंबई ,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, एल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईक, सीईओ एस.एम. सुब्रमण्यम, चेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईक, प्राचार्य मधुरा फडके, शिक्षक आदी उपस्थित होते.

अमित शाह यांनी मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तसेच वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेल्या गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजाही केली.

अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील गणपतीचे दर्शन घेतले आणि  पूजा केली.

भारतीय शिक्षणाचे मूलभूत तत्व आत्मसात करण्यासोबतच ते जगभरात यशस्वी करण्यात योगदान देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आहे असे अमित शाह म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण-2020 म्हणजे डॉ. राधाकृष्णन यांच्या शिक्षणाविषयीच्या विचारांचे जणू प्रतिबिंब होय असे सांगत ते पुढे म्हणाले की ए एम नाईक शाळा या नव्या शैक्षणिक धोरणाची प्राथमिक शिक्षणाची संकल्पना साकारत आहे. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षण हे बहुआयामी होते आणि मोदीजींनी आणलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 हे मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम बनेल.

हे शैक्षणिक धोरण केवळ एक धोरणात्मक दस्तऐवज नाही, तर भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब आहे आणि आपल्या मूळ भारतीय शिक्षण पद्धती आणि परंपरेचा त्यात दरवळ आहे. 

डॉ. राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ, महान शिक्षक, विद्वान, सर्जनशील प्रतिभावंत  आणि मानवतावादी आणि आध्यात्मवादी द्रष्टे होते. डॉ.राधाकृष्णन यांनी गुरूची  अतिशय सोपी व्याख्या केली आहे . विचार करण्याची क्षमता अद्याप विकसित न झालेले  मूल घरातून बाहेर पडून  गुरूकडे येते आणि त्याला ज्ञान संपादन करण्यात जो  मदत करतो तो  गुरू असे त्यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, डॉ. नाईक यांचे राष्ट्राच्या निर्मितीत, अनेक क्षेत्रातील योगदान लक्षात घेत भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे. एल अँड टी कंपनीला या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात डॉक्टर नाईक यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारताला अनेक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात एल अँड टी कंपनीची आणि डॉ. नाईक यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

अमित शाह म्हणाले की, नवीन शिक्षण धोरणांतर्गत प्राथमिक शिक्षणाच्या संकल्पनेला येथे प्रत्यक्षात साकार होताना आपण पाहू शकतो. या विद्यालयात प्रयोगशाळा, ग्रंथालय, मुलांसाठी रंगमंच आणि खेळासाठी मैदान यासारख्या अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे एका परिपूर्ण शिक्षण संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. नाईक यांचा ट्रस्ट गुजरात आणि महाराष्ट्रामधील अनेक शिक्षण संस्थांचे संवर्धन करत आहे. गुजरातमध्ये कौशल्य निर्माणाची सुविधा त्यांनीच सुरू केली.

नवीन शिक्षण धोरण आणि जुनी शिक्षण व्यवस्था यामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यात आल्याचे अमित शाह यांनी पुढे सांगितले. देशात ज्ञान आणि शिक्षण पद्धती बहुआयामी होती आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने मुलांमधली उपजत प्रतिभा जाणून घेऊन या प्रतिभेला उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करण्याचे काम केले आहे. हे शिक्षण धोरण केवळ एक धोरणात्मक दस्तऐवज नसून भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. हे शैक्षणिक धोरण आपल्या मूळ भारतीय शिक्षण पद्धती आणि शिक्षण परंपरेच्या मिश्र सुगंधाने दरवळत आहे. या शिक्षण धोरणात व्यक्तीला शिक्षित करण्याबरोबरच त्याला महान बनवण्याचाही विचार करण्यात आला आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मुल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत. जेव्हा मुलाच्या विचारांमधून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तेव्हाच ते मुल आत्मविश्वासाने महान व्यक्ती बनण्याचा प्रवास सुरू करेल, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.