वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये आता “नो क्रेडिट व्यवहार”

वैजापूर,​४​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील आडत व्यापा-यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हातात रोख रक्कम सुपूर्द करावी किंवा ऑनलाईन बॅकिंगद्वारे खरेदी व्यवहार पूर्ण करण्याचे धडक फर्मान बाजार समिती प्रशासनाने काढले आहे. रोख किंवा बॅकद्वारे व्यवहार करण्यासाठी तयार नसलेल्या

व्यापा-यांसोबत शेतक-यांनी कांदा विक्रीचा व्यवहार करु नये अशी स्पष्ट सूचना समितीकडून कांदा उत्पादकांसाठी जारी करण्यात आली आहे. 


बाजार  समितीचा व्यापा-यांसाठी दैनंदिन व्यवहार वजा-बाकी ठेवण्याचा निर्णयावर कांदा उत्पादक  शेतक-यांनी आम्ही कष्टाने पिकवलेल्या कांदा मातीमोल दराने विक्री होत आहे. शेतक-यांना भाव वाढीचा दिलासा देण्याऐवजी व्यापा-याकडून मर्यादित स्वरुपात कांदा खरेदीसाठी घेतलेल्या खबरदारीचा प्रकार असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. कांदा पिकाचे विक्रमी उत्पादनामुळे देशभरातील कांदा खरेदी केंद्रात बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या फे-यात सापडला आहे. कांदा लागवडीपासून ते काढणी पर्यत एकरी 60 हजारापर्यंत उत्पादन खर्च झाला मात्र बाजारभाव हजार ते बाराशे आत असल्याने नफा तोट्याचे गणित बिघडले आहे. माफक बाजारभाव मिळेल या हेतूने चाळी साठवणूक केलेला बहुतांश कांदा खराब झाला हाताशी उरला सुरला कांदा विक्रीला काढण्याची तयारी केली तर बाजारभाव कोसळले त्यामुळे कांदयामुळे या वर्षी  आर्थिक वांदे झाल्याची ओरड शेतक-यांतून होत आहे. त्या स्थितीत बाजार समितीतील काळजीवाहू संचालकांनी घायगाव शिवारातील कांदा खरेदी केंद्रात शेतक-यांकडील कांदा खरेदी करताना रोख स्वरुपात करावा किंवा त्यांच्या बॅक खात्यात ऑनलाईन द्वारे देयके रक्कम जमा करावी अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच झालेल्या व्यवहाराचा धनादेश तीन दिवसात न वटल्यास समितीकडे तक्रार करण्याचा फतवा काढला. मात्र यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून भाववाढ करण्यासंदर्भात उपाययोजना न केल्याबद्दल संचालक मंडळाच्या नावाने संताप व्यक्त केला जातोय.

नियम जुना अंमलबजावणीचा गाजावाजा – सिताराम पाटील वैद्य
पणन मंडळाने बाजार समिती आवारात शेतमालाचे खरेदी व्यवहार रोख स्वरुपात त्यांच दिवशी करण्याचे नियम केलेले आहे.समितीकडून जुन्याच निर्णयाची अंमलबजावणीचा गाजावाजा केला आहे. कांदा पिकाला बाजारभाव कमी असल्याने शेतक-यासाठी दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्याचा निर्णय हितकारक वाटतोय मात्र भाववाढ झाल्यानंतर या निर्णयाचे सातत्य टिकवण्याची हमी समितीने घेतली पाहिजे अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी सिताराम वैद्य यांनी व्यक्त केली.

नियमांच्या अंमलबजवणीचे प्रयत्न – सभापती भागीनाथ मगर

बाजार समितीने व्यापा-यांना रोख व्यवहार करण्याचे पणन मंडळाचे पुर्वीचे नियम आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे सभापती भागीनाथ मगर यांनी सांगितले.

संचालक मंडळाचा निर्णय – सुरेश तांबे
बाजार समितीच्या आवारात एकूण 42 व्यापाऱ्यांकडूनकांदा खरेदी व्यवहार केला जातो.काही व्यापारी शेतक-यांना वेळेत व्यवहाराची रक्कम देत नाहीत त्यामुळे संचालकांकडे तक्रार गेल्याने खरेदी केंद्रातील व्यवहार रोख स्वरुपात करण्याचा निर्णय संचालकांनी घेतल्याचे व्यापारी प्रतिनिधी संचालक सुरेश तांबे यांनी सांगितले.