विमान वाहतूक हे देशातील वाहतुकीचे प्रमुख साधन बनेल : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

विमानाच्या इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं सिंधिया यांनी केले सर्व राज्यांना आवाहन

कृषी उड्डाण योजने अंतर्गत नाशवंत शेत मालाची जलद आणि सवलतीच्या दरात वाहतूक करण्याची योजना विचाराधीन

पुणे ,​३​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- येत्या काही काळात विमान वाहतूक हे देशातील वाहतुकीचे प्रमुख साधन बनेल असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज पुण्यात व्यक्त केला. पुण्याजवळील लवळे येथे सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशांतर्गत विमान वाहतूक सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.त्या दृष्टिकोनातूनच  विमानाच्या इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन सर्व राज्यांना केल्याचं सिंधिया यांनी स्पष्ट केलं. देशभरातील 22 राज्यांपैकी 16 राज्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. 

नागरी विमान वाहतूक म्हणजे नुसतीच विमानांची संख्या आणि विमानतळ नाही तर वाढती विमान संख्या आणि उड्डाणे लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे वैमानिक तयार करणे,अन्य कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देणे हे देखील मंत्रालयाचे काम आहे त्यादृष्टीने मागील सहा महिन्यांत नऊ वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्या आहेत तर येत्या दीड वर्षाच्या कालावधीत आणखी 15 संस्था सुरू केल्या जाणार असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. कृषी उड्डाण योजने अंतर्गत नाशवंत शेत मालाची जलद आणि सवलतीच्या दरात वाहतूक करण्याची योजना आहे . गेल्या 2 वर्षात विमानाने होणाऱ्या  माल वाहतुकीच्या प्रमाणात 19 टक्के पर्यंत वाढ झाल्याची माहिती सिंधिया यांनी दिली.

Image

तत्पूर्वी  विद्यार्थ्यांना संबोधित करताना सिंधिया यांनी नेतृत्वा साठी आवश्यक असणारे 5 प्रमुख गुण सांगितले . सफल नेता होण्यासाठी हृदयापासून आलेले धैर्य, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची  आक्रमक वृत्ती, टीम वर्क ,आणि सहकाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची गरज असल्याचे म्हणाले. आपली मते इतरांवर लादणाऱ्या व्यक्ती  कधीही यशस्वी नेता होऊ शकत नाहीत तर इतरांची बाजू समजून घेऊन त्यातून योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता नेत्यांमध्ये  हवी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांची अनेक उदाहरणे दिली . छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पवित्र भूमीत आल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सिंधिया म्हणाले.राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. संस्थेचे कुलपती आणि संस्थापक डॉ. एस बी मुजुमदार यांनी सिंधिया आणि अन्य मान्यवरांचे स्वागत केले तर कुलगुरू रजनी गुप्ते यांनी आभार प्रदर्शन केले.