गुलामीची एक निशाणी भारताने आज उतरवली-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित! : पंतप्रधान

कोची : भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवले आहे. भारताने गुलामीची एक निशाणी आज उतरवली. याचे कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होते. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारे भारतीय नौदलाचे चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेले आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण करताना दिली. नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचे महत्त्व जाणले. त्यांनी नौदलाचा विकास केला, असेही मोदी म्हणाले.

नौदलाच्या नव्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आले असून डाव्या बाजूला तिरंगा तर उजव्या बाजूला नौदलाला संबोधित निळ्या रंगाचे नवे चिन्ह साकारण्यात आले आहे. त्या खाली संस्कृत भाषेत ‘शं नो वरूणः’ असे लिहिण्यात आले आहे. “इतिहास बदलून टाकणारी आणखी एक ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी घडली आहे. भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले असून भारताला नवा ध्वज मिळाला आहे. आजवर या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलाने फडकणार आहे.”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.