नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 35 हजार 752 क्यूसेस पाणी विसर्ग ; गोदावरी दुथडी भरून वाहू लागली

वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठयात वाढ 

वैजापूर,​२​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने नाशिक जिल्हयातील गंगापूर, दारणा, मुकणे, पालखेडसह अन्य धरणे काठोकाठ भरली असून यासर्व धरणांतून जवळपास 35 हजार 752 क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात हे पाणी सोडण्यात आले असून गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे.

पावसामुळे वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने नाशिक जिल्हयातील दारणा, मुकणे, वाकी, भांम, भावली, गंगापूर,पालखेडसह सर्वच्या सर्व अकरा धरणांमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणे काठोकाठ भरल्यामुळे या धरणांतून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याद्वारे गोदावरीत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 35 हजार 752 क्यूसेसने गोदावरीत पाणी सोडण्यात आले असून गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे.

नाशिक जिल्हयातील धरणे व त्यातून आज सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे –दारणा    – 202.44 दलघमी  (100 टक्के)  मुकणे    – 214.16 दलघमी (98.03 टक्के)  गंगापूर   – 160.10 दलघमी  (100 टक्के)    पालखेड – 20.13 दलघमी  (95.36 टक्के) वाकी     – 75.80  दलघमी  (96.98 टक्के)भाम      – 75.42  दलघमी  (100 टक्के)भावली   – 44.56  दलघमी  (100 टक्के)

दारणा धरणांतून 5984 क्यूसेस, मुकणे धरणांतून 726 क्यूसेस, वाकी धरणांतून 331 क्यूसेस, भाम धरणांतून 208 क्यूसेस, गंगापूर धरणांतून 5884 क्यूसेस तर पालखेड धरणांतून 2800 क्यूसेसने  विसर्ग सुरू आहे.गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्पात 42.48 टक्के, बोर दहेगांव मध्यम प्रकल्पात 23.88 टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात 20.54 टक्के, सटाणा लघु तलावात 11.07 टक्के, गाढेपिंपळगांव लघु तलावात 07.18 टक्के, मन्याड साठवण तलावात 56 टक्के पाणीसाठा असून बिलवणी लघु तलाव, खंडाळा लघु तलाव व जरुळ लघु तलाव या प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याच्या खाली आहे.