सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय या पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद,​२​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली’ या संस्थेने सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय – 2022 या वर्षीचा पुरस्कार औरंगाबाद येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या  छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  या महाविद्यालयास देऊन सन्मानित करण्यात आले.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली ही देश पातळीवरील अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय संस्था आहे. औद्योगिक क्षेत्राला लागणारे तांत्रिक कुशल मनुष्यबळ विकसित करणे व नवनवीन तंत्रज्ञानाची शैक्षणिक क्षेत्राशी सांगड घालणे. या प्रमुख उद्देशाने 1941 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
भारतातील अडीच हजारांपेक्षा जास्त संस्था (IITs, IISCs, NITs आणि इतर अग्रमानांकित तंत्रज्ञान महाविद्यालय व संस्था), एक लाखांपेक्षा जास्त तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक तसेच पाच लाखांपेक्षा जास्त अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी या राष्ट्रीय संस्थेचे सभासद आहेत.
सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय या पुरस्कारासाठी छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने यशस्वीरित्या राबविलेल्या शैक्षणिक, सामाजिक, तंत्रज्ञान विषयक तसेच नाविन्यता, संशोधन, उद्योजकता विकास आणि कॅम्पस प्लेसमेंट या विविध उपक्रमामुळे हा मानाचा बहुमान महाविद्यालयास प्राप्त झाला आहे.
ISTE च्या 51 व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी गोवा येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांना ‘गोवा’ या राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिएशनचे (NBA) चेअरमन प्रा. के. के. अग्रवाल आणि ISTE चे अध्यक्ष श्री. प्रतापसिंह देसाई यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे म्हणाले की आमच्या महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे व पालक, औद्योगिक क्षेत्र आणि संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच सर्व व्यवस्थापन मंडळ यांच्या सहकार्य, बहुमूल्य आणि अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आम्ही या सर्वोत्कृष्ट पुरस्कारास पात्र ठरलो. या पुरस्कारातून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन भविष्यात अधिकाधिक समाजाभिमुख व देशोपयोगी उत्कृष्ट मेहनती अभियंते घडविण्याचे कार्य अधिक जोमाने करूत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     

अभियांत्रिकी महाविद्यालयास मिळालेल्या सर्वोत्कृष्ट सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंजि. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर आणि जनसंपर्क अधिकारी श्री. संजय पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


श्री. पद्माकरराव मुळे
सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, औरंगाबाद.


            “कुठल्याही संस्थेची प्रगती आणि भरभराट ही त्या संस्थेमधील मनुष्यबळाच्या कार्यकुशलता आणि मेहनतीवर अवलंबून असते. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी,विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या मेहनत आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे महाविद्यालय हे यश संपादन करू शकले. याप्रसंगी मी आमच्या अभियांत्रिकीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, कौतुक करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो”…
पद्माकरराव मुळे सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद.