फडणवीस, बावनकुळेंनंतर मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

मुख्यमंत्र्यांनी घेतले नार्वेकरांच्या बाप्पाचे दर्शन..

मुंबई ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भाजपा आणि मनसे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरेंना शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणाऱ्या नेतेमंडळींची संख्यादेखील वाढू लागली आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया दिली. “सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. उत्साहाचे वातावरण सगळीकडे आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचे मध्यंतरी ऑपरेशन झाले होते. प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार?” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज ठाकरेंनी या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक भूमिकांचे त्यांनी समर्थन देखील केले होते. या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यात नुकताच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी “मी कौटुंबिक कारणांसाठी ही भेट घेतली होती. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. मात्र, युतीबाबतचा निर्णय आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी, अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस हे घेतील”, असे बावनकुळे म्हणाले होते.

दरम्यान, मनसे आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. या पक्षांच्या नेतेमंडळींकडून सातत्याने युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशीच भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना अधिकच खतपाणी घातले जात असताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात संभाजी ब्रिगेडशी युती केल्याची घोषणा केल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा झाली.

गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री अमित शहा हे सुद्धा त्यांची सोमवारी भेट घेणार असल्याचे समजते. याआधी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. फडणवीस-राज यांची भेट गुलदस्त्यात असली तरी बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी आपण राज ठाकरे यांना भेटल्याचे नाकारले नाही. उलट याबाबतची छायाचित्रे सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. आठवडाभराच्या कालावधीमध्ये एका पक्षाचे चार महत्त्वाचे नेते राज ठाकरे यांना भेटत असतील, तर त्याचा निश्‍चितच काहीतरी अर्थ आहे हे समजून घ्यावे लागणार आहे.

दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली तर भाजपला राज ठाकरे यांच्यासारखा मित्र निश्‍चितच हवा आहे. आगामी सर्व निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या गटासोबतच लढवल्या जातील अशी घोषणा फडणवीस आणि भाजपाचे इतर नेत्यांनी केली असली तरी भाजपने इतर कोणाशी मैत्री करू नये अशी कोणत्याही प्रकारची अट एकनाथ शिंदे यांनी घातली नसल्यानेच या सर्व घडामोडी केल्या जात आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी मतदारांची मते निश्‍चितच महत्त्वाची ठरणार आहेत. याच मतदारांच्या भांडवलावर आपण पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत सत्तेवर येऊ, असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत आहे; पण उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारा जो मराठी मतदार आहे त्यामध्ये जर विभागणी करायची असेल तर राज ठाकरे यांच्यासारख्या मराठी मतदारांचा पाठिंबा असणारा एखादा नेता आपल्यासोबत असावा या हेतूने भाजप नेत्यांनी ही राजकीय पेरणी सुरू केली असावी हे उघड आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतले नार्वेकरांच्या बाप्पाचे दर्शन..

EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर अनेकदा अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन नार्वेकर कुटुंबियांची भेट घेतली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 

 
 
मिलिंद नार्वेकर यांनी गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानले जातात. सध्या शिवसेना कोणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जातो. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
 
 
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांना घेवून सूरतमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू नेते मिलिंद नार्वेकर यांना सूरतला पाठवलं होतं. मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळी सूरत येथे जावून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. सुरत येथे शिंदे व नार्वेकरांमध्ये थोडावेळ चर्चा झाली होती. या चर्चेत शिंदेंनी परत येण्यास नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मिलिद नार्वेकर यांची आज भेट झाली.