‘उध्दवची सेना संपली’; शिंदेंची शिवसेना खरी : नारायण राणे

खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनीच केली : नारायण राणे

मुंबई ,३० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व उरलेले नाही. दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखे आता त्यांच्याकडे आता उरले तरी काय, असा खोचक प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्वाळाही राणे यांनी यावेळी दिला.

घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही, त्यामुळे ते सरकार गेले ही गणरायाची कृपाच आहे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच खरी गद्दारी केली आहे अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले.

भाजपचे नेते निलेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्यात आली. यावेळी निलेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई ते कुडाळ दरम्यान निलेश राणे यांनी आरक्षित केलेल्या ट्रेनच्या सुविधेबाबत नारायण राणे यांनी समाधान व्यक्त केले. निलेश राणे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून याकडे आम्ही लक्ष देणार असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केली, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हे गद्दारी करून मिळवले असल्याचा हल्लाबोल राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवले असल्याचे राणे यांनी म्हटले.

आवाज कोणाचा याचे उत्तर मिळाले असून आता त्यांचा आवाज बंद झाला असल्याचे राणे यांनी म्हटले. शिवसेनेकडे आमदार राहिलेच नाही. शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तर, उरलेले काहीजण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जी कामे केली ती आपल्या निकटवर्तीयांसाठी केली असल्याचा आरोप राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केल्याची टीका राणे यांनी केली आहे. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, असेही राणे यांनी म्हटले आहे.

घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकार १० वर्ष मागे गेले. आता गणरायाच्या कृपेने मागील सरकार गेले आणि नवीन सरकार आले असल्याचे राणे यांनी म्हटले. महाराष्ट्रामध्ये भाजपची केंद्रात राज्यात सत्ता आहे. त्यामुळे आता राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.