भाजपा-मनसे युतीचे संकेत!

फडणवीस, तावडेनंतर बावनकुळेही पोहचले ‘शिवतीर्थ’वर

मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मनसे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर तासभर खलबते झाली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

ते आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. आमचे पारिवारीक संबंध आहेत. त्यामुळे ही मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही बावनकुळे यांनी सांगितले. युतीचा निर्णय हा वरिष्ठांकडून घेतला जातो. पण आज मी त्यासाठी नव्हे तर आमचे चांगले संबंध असल्याने आणि राज यांचे हिंदुत्ववादी भूमिका कट्टर आहे. ती उद्धव ठाकरे यांच्यारखी बेगडी नाही. त्यामुळे राज आणि आमच्यात वैचारीक साम्य आहे. यामुळेच आमचे नेते राज यांना भेटतात. त्यामध्ये कोणतेही राजकीय उद्देश नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढणे हे भाजपा-मनसेच्या युतीचे संकेत मानले जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जातानाच्या रणनितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या कालच्या भेटीचे वृत्त मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहे. पण जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी करण्यासाठी सोमवारी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘सागर’ बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.