विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, गडकरी असे का म्हणाले?

नागपूर : भाजपाच्या कार्यकारिणीतून पत्ता कट झाल्यापासून नितीन गडकरी वारंवार आपल्या विधानांमुळे चर्चेत येत आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. तेव्हाचं त्यांचं विधानही आता चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या विद्यार्थी दशेतला हा किस्सा त्यांनी सांगितला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलंय. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितले की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.

नितीन गडकरींनी नुकतेच एक विधान केले होते. ज्यात ते म्हणाले होते की, कधीकधी आपल्याला राजकारण सोडण्याची इच्छा होते. कारण आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत. आजकाल राजकारण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनण्याऐवजी सत्ताकारणात गुंतत चालले आहे. गडकरी असेही म्हणाले होते की, पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, कोणाला काही देणार नाही. जर तुम्हाला मतदान करायचे तर करा, नाहीतर नका करू.