मारुती-सुझुकीचे यश हे भारत-जपानच्या मजबूत भागीदारीचे प्रतीक-पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या आठ वर्षांत भारत आणि जपानमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत

भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

भारताच्या आर्थिक विकासाला आणखी गती मिळाली आहे : जपानचे पंतप्रधान किशिदा

गांधीनगर ,२८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे  भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, राज्याचे मंत्री जगदीश पांचाळ, सुझुकी  मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष  ओ सुझुकी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी सुझुकी  आणि मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखवण्यात आला.

जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की गेल्या  4 दशकांच्या कालावधीतल्या  मारुती सुझुकीच्या विकासामुळे  भारत आणि जपान दरम्यान आर्थिक संबंध अधिक  मजबूत झाले.  भारतीय बाजारपेठेतील क्षमता ओळखल्याबद्दल त्यांनी सुझुकीच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. “मला वाटते  हे यश भारतातील जनता  आणि सरकार यांच्या सामंजस्य  आणि पाठिंब्याचे आहे. अलिकडच्या काळात पंतप्रधान मोदींच्या खंबीर आणि मार्गदर्शक  नेतृत्वाखाली उत्पादन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या  विविध सहाय्यक उपाययोजनांमुळे  भारताच्या  आर्थिक विकासाला आणखी गती मिळाली आहे ,”असे  ते म्हणाले. आणखीही इतर जपानी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दर्शवत असल्याची माहिती त्यांनी दिली. भारत आणि जपान यांच्या संबंधांना यंदा 70 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हे वर्ष महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी  अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले , “पंतप्रधान मोदींच्या साथीने  ‘जपान-भारत धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी’ विकसित करण्यासाठी आणि “मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत ” क्षेत्राचे स्वप्न  साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा दृढ निर्धार आहे.’

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सुझुकी कॉर्पोरेशनशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले. “भारतातील कुटुंबांसोबत सुझुकीच्या मजबूत  संबंधांना आता 40 वर्षे पूर्ण झाली आहेत “, असे  ते म्हणाले. “मारुती-सुझुकीचे यश हे भारत-जपानच्या मजबूत भागीदारीचेही प्रतीक आहे. गेल्या आठ वर्षांत आपल्या दोन्ही देशांमधील हे संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. आज गुजरात-महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन पासून ते उत्तर प्रदेशातील बनारसमधील रुद्राक्ष केंद्रापर्यंत अनेक विकास प्रकल्प हे भारत-जपानमधील  मैत्रीची उदाहरणे आहेत. “जेव्हा या मैत्रीबाबत बोलले जाते  तेव्हा प्रत्येक भारतीयाला आमचे मित्र  माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांची आठवण येते.” असे ते म्हणाले. आबे सान जेव्हा गुजरातमध्ये आले होते तेव्हा त्यांनी येथे थोडा वेळ व्यतीत केला  होता, याची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, गुजरातच्या लोकांना ते अजूनही आठवत आहे.  “आपल्या देशांना आणखी जवळ आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज पंतप्रधान किशिदा  पुढे नेत आहेत,” असे ते  म्हणाले.

13 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये सुझुकीचे आगमन झाल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि त्याचबरोबर स्वत:ला शासनाचे एक उत्तम मॉडेल म्हणून सादर करण्याचा गुजरातच्या  आत्मविश्वासाचेही स्मरण केले.  “मला आनंद आहे की गुजरातने सुझुकीला  दिलेले वचन पाळले आणि सुझुकीनेही गुजरातच्या इच्छेचा तितकाच सन्मान केला.  गुजरात हे जगातील अव्वल वाहन उत्पादन केंद्र म्हणून उदयाला आले आहे,” असे ते म्हणाले. गुजरात आणि जपान यांच्यातील संबंधांवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, ते राजनैतिक आयामांच्याही पलिकडचे आहेत.

मला आठवतं,  2009 मध्ये व्हायब्रंट गुजरात परिषद सुरू झाली, तेव्हापासून जपान एक भागीदार देश म्हणून या उपक्रमाशी जोडला गेला”, असं पंतप्रधान म्हणाले.  जपानी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये घरच्यासारखं वाटावं यासाठी गुजरातमध्ये मिनी जपान उभारण्याच्या संकल्पाचे स्मरण केले.  हे लक्षात घेऊन अनेक छोट्या मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या.  जपानी पाककृती पुरवणारी उपाहारगृह, अनेक जागतिक दर्जाची गोल्फ मैदानं  आणि जपानी भाषेचा वापर ही त्यापैकीच काही उदाहरणं आहेत.”आमचे उपक्रम  जपानसाठी नेहमीच गांभिर्य आणि आदर राखणारे राहिले, म्हणूनच गुजरातमध्ये सुझुकीसह सुमारे 125 जपानी कंपन्या कार्यरत आहेत”, असं ते पुढे म्हणाले.  अहमदाबादमधील JETRO म्हणजेच जपान एक्स्टर्नल ट्रेड  ऑर्गनायझेशनद्वारा चालवलं जाणार केंद्र, अनेक कंपन्यांना प्लग-अँड-प्ले या वाहतूक सुलभीकरणाबाबतच्या  सुविधा पुरवत आहे.  जपान इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मॅन्युफॅक्चरिंग) अनेक लोकांना प्रशिक्षण देत आहे.  गुजरातच्या विकास प्रवासात ‘कायझेन’, या व्यवसाय वृद्धीसाठीच्या जपानी तत्त्वज्ञानाच्या योगदानाची पंतप्रधानांनी यावेळी दखल घेतली.  पंतप्रधान म्हणाले की, यामधल्या अनेक क्लृप्त्या त्यांनी  पंतप्रधान कार्यालय आणि  इतर विभागांमध्ये देखील उपयोगात आणल्या.

इलेक्ट्रिक वाहनांचं एक मोठं वैशिष्ट्य अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की ही वाहनं धावताना आवाज करत नाहीत. दुचाकी असो अथवा चारचाकी, ही वाहनं आवाज करत नाहीत.  “ही अशी शांतता  केवळ या वाहनांच्या अभियांत्रिकीतूनच प्रतित होत नाही, तर देशातील शांतता क्रांतीची ही सुरुवात आहे”, असं ते म्हणाले.  विजेवर चालणाऱ्या वाहनांची परिसंस्था, ही एकंदर व्यवस्था,  वाढीस लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना विविध प्रोत्साहनपर सुविधा  दिल्या जात आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या बाबतीतल्या आर्थिक व्यवहारांसाठी आयकरात सवलत आणि कर्ज प्रक्रिया सुलभ करणं अशी  अनेक पावलं सरकारनं उचलली आहेत, असं ते म्हणाले.  “ वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा पुरवठा वाढवण्यासाठी, वाहन आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मिती प्रक्रियेत, उत्पादनाशी संलग्न  प्रोत्साहन योजना सुरू करण्याचं कामही वेगानं सुरू आहे ”, असंही पंतप्रधान म्हणाले.  इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी भरभक्कम  पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अनेक धोरणात्मक निर्णयही घेण्यात आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“2022 च्या अर्थसंकल्पात बॅटरी स्वॅपिंगचं (बॅटरींची अदलाबदल ) धोरणही मांडण्यात आलं आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.  ” पुरवठा, मागणी आणि परिसंस्थेच्या-निर्मिती व्यवस्थेच्या बळकटीकरणामुळे, विद्युत वाहनांचं क्षेत्र प्रगती करेल हे नक्की आहे “, असंही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी टिपणी केली की भारतानं COP-26 परिषदेत घोषित केलं आहे की वीज निर्मितीच्या आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टापैकी 50% उद्दिष्ट भारत 2030 सालापर्यंत  गैर-जीवाश्म स्रोतांकडून साध्य करेल. “आम्ही 2070 सालापर्यंत  ‘नेट झिरो’ लक्ष्य निर्धारित केलं आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.  मारुती सुझुकी, जैवइंधन, इथेनॉल मिश्रण आणि हायब्रीड ईव्हीसारख्या (इंधनाची  मिश्र क्षमता बाळगणारी विद्युत वाहनं)  गोष्टींवरही काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  सुझुकीनं कॉम्प्रेस्ड बायोमिथेन गॅसशी संबंधित प्रकल्पांवर काम सुरू करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. निकोप स्पर्धा आणि परस्पर सामंजस्यासाठी चांगलं वातावरण निर्माण व्हावं, अशी इच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.  “याचा देश आणि व्यवसाय दोघांनाही फायदा होईल”, असं ते म्हणाले.  “अमृतकाळातल्या पुढील 25 वर्षांमध्ये आपल्या उर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी भारतानं आत्मनिर्भर- स्वावलंबी व्हावं हे आमचं ध्येय आहे. वाहतूक क्षेत्रात ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमांना आपलं प्राधान्य असलं पाहिजे.  मला विश्वास आहे की आम्ही हे साध्य करू शकू”, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

पार्श्वभूमी

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी भारतातील सुझुकी समूहाच्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली – गुजरात मध्ये हंसलपूर इथे सुझुकी मोटर गुजरात इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ( विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरींचं उत्पादन )आणि खरखोडा, हरयाणा इथे, मारुती सुझुकीची आगामी वाहन निर्मिती सुविधा.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी आधुनिक केमिस्ट्री  सेल बॅटरीज तयार करण्यासाठी, गुजरातमधील हंसलपूर इथे, सुझुकी मोटर गुजरात इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, हा प्रकल्प, सुमारे 7 हजार 300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्थापन केला जाईल.  हरयाणात खरखोडा  इथल्या वाहन निर्मिती प्रकल्पात प्रतिवर्षी 10 लाख प्रवासी वाहनं तयार करण्याची क्षमता असेल.  जगातील एकाच ठिकाणी प्रवासी वाहनांची निर्मिती करणारा हा सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असेल.  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या उभारणीसाठी 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुक केली जाणार आहे.