भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली,२७ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी  आज  शपथ  घेतली.

राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी  सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. न्या.लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022  रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या.लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव आहे. आजही आठ ते दहा लळीत कुटुंब या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबाचे काही कारणाने कुंभवडे, पेंढरी, हरचेली चुना कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोहाजवळ आपटे या गावी स्थलांतर झाले होते. लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे.त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. न्या.उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. न्या.लळीत हे 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही उदय लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश एस. एम. सिकरी यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली होती.