राष्ट्रीय कर्करोग ग्रिडने केली नवीन डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्राची स्थापना

मुंबई ,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- डिजिटल तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या माध्यमातून देशभरात कर्करोग उपचार आणि देखभाल प्रक्रियेत जास्तीतजास्त सुधारणा व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कर्करोग ग्रिडने कोईटा केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी कोईटा प्रतिष्ठानने योगदान दिले असून पुढील पाच वर्ष हे साहाय्य मिळणार आहे. टाटा मेमोरियल सेंटर आणि कोईटा फाउंडेशन यांनी आज मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात यासंदर्भातील  सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून ही औपचारिक प्रक्रिया पूर्ण  केली.

कर्करोग चिकित्सा ही प्रक्रिया अधिक झपाट्याने विस्तारते आहे आणि जगभरात प्रक्रियेत डिजिटल उपकरणांचा वापर देखील अनिवार्य झाला आहे. देशभरातील  कर्करोग चिकित्सा प्रक्रियेचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी कोईटा डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्र (केसीडीओ) महत्वाची भूमिका बजावणार आहे. याअंतर्गत (केसीडीओ), राष्ट्रीय कर्करोग ग्रिड ला डिजिटल आरोग्य, डिजिटल आरोग्य साधनांचा अवलंब, यांसह  इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वैद्यकीय नोंद, आरोग्य सेवांची परस्परांवर अवलंबून असलेली क्षमता, अहवाल आणि विश्लेषण या सर्व तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रियांमध्ये सर्वोत्तम पद्धत प्रदान करेल.

केसीडीओ, राष्ट्रीय कर्करोग ग्रिड आणि प्रायोगिक तत्वावर चालणाऱ्या ग्रिडच्या  रुग्णालयांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दृष्टीने  सक्षम करेल.  यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, उपकरणांचा अभ्यास , बिग डेटा, ऑटोमेशन, क्लाउड, मोबाइल इत्यादी अद्ययावत तंत्रज्ञानाचा  समावेश आहे – ज्यायोगे  रुग्णालये, डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना लाभ होईल. विशेषत: निम-शहरी आणि ग्रामीण भागात टेलि-मेडिसीन आणि रिमोट पेशंट मॉनिटरिंग अर्थात रुग्ण प्रत्यक्ष समोर नसेल तरी दूरदृश्यप्रणाली  सारख्या डिजिटल साधनांचा अंगीकार  केल्याने उपचार करणे अधिक सुलभ होईल, कृत्रिम बुद्धिमत्तेने जोडलेल्या रुग्णालयांमुळे डॉक्टरांना देखील दूरवरच्या रुग्णाला सेवा देणं सहज शक्य होईल तसेच रुग्णांसाठी असलेल्या मोबाईल अॅप्समुळे  रुग्णांना औषधांविषयीची माहिती  आणि  घ्यावयाची काळजी याबाबत असलेल्या  मार्गदर्शक तत्त्वांचे व्यवस्थित पालन करता येईल. त्याचप्रमाणे, सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा संदर्भातील  डेटा विश्लेषणाचा वापर केल्याने  चिकित्साविषयक परिणामांचा झालेला नेमका अभ्यास करणे सुलभ होईल, निरनिराळ्या उपचार पद्धतींचा प्रभाव पडताळून पाहता येईल आणि त्याबाबत काही ठोस निष्कर्ष काढता येतील. कर्करोग  सेवेमध्ये संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी केसीडीओ शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसोबतही भागीदारी करेल.

कोईटा डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्र हा एक समयोचित उपक्रम असून यामुळे रुग्णालये, आरोग्यसेवा क्षेत्रातील तंत्रज्ञानकेंद्रित कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमध्ये एक संशोधनाधिष्ठित व्यवस्था निर्माण होईल, ज्यायोगे कर्करोग उपचार आणि देखभाल या विषयातील आव्हानांना तोंड देणे सुलभ होईल. या व्यवस्थेचा सकारात्मक प्रभाव केवळ कर्करोग देखभाल या विषयाशी निगडित न राहता आरोग्य क्षेत्रात व्यापून राहील, असे  टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक, डॉ आर ए बडवे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कर्करोग ग्रिडमध्ये कोईटा डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्राची स्थापना होत असल्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या नवीन केंद्रामुळे एनसीजीच्या अखत्यारीतील भागीदार रुग्णालयांमध्ये डिजिटल उपकरणांचा वापर करून कर्करोग उपचार पद्धती अधिक प्रगत होईल आणि भारतात सर्वाना परवडणाऱ्या दरात  सहजसाध्य होईल, असे  एनसीजीचे निमंत्रक डॉ. सीएस प्रमेश म्हणाले.

एनसीजी सोबत भागीदारी करून  त्यांच्या  डिजिटल आरोग्य उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तसेच संपूर्ण भारतातील कर्करोगाच्या देखभाल प्रक्रियेमध्ये अर्थपूर्ण सुधारणा करण्यासाठी “कोईटा प्रतिष्ठान” वचनबद्ध आहे.  राष्ट्रीय अभियान असलेल्या महत्वपूर्ण अशा आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी  केसीडीओ, एनसीजी च्या रुग्णालयांना साहाय्य करेल असे कोईटा फाउंडेशनचे संचालक रिजवान कोईटा म्हणाले.

राष्ट्रीय कर्करोग ग्रिड :

राष्ट्रीय कर्करोग ग्रिड  (एनसीजी) हा भारत सरकारच्या  अणुऊर्जा विभागाचा  एक उपक्रम आहे. टाटा मेमोरियल सेंटर ही संस्था एनसीजीची अनुदानप्राप्त संस्था आहे. देशभरात कर्करोगाच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांसाठी रुग्णांच्या  देखभालीसाठीचे  एकसमान मानक विकसित करण्याच्या उद्देशाने; कर्करोग उपचार केंद्र, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि धर्मादाय संस्था उभारणे, ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण आणि शिक्षण प्रदान करणे, कर्करोगावर एकत्रित, मूलभूत,  आणि चिकित्साविषयक संशोधन करणे. हा यामागचा उद्देश आहे. एनसीजीची आज संपूर्ण भारतात 270 हून अधिक रुग्णालये आहेत.

कोईटा प्रतिष्ठानविषयी :

कोईटा प्रतिष्ठान  (www.koitafoundation.org ) ही  ना नफा तत्वावर चालणारी संस्था असून त्यांची  दोन प्राधान्य  क्षेत्रे आहेत. बिगर सरकारी संस्थांचे परिवर्तन आणि डिजिटल आरोग्य. कोईटा फाऊंडेशनच्या   डिजिटल आरोग्य  उपक्रमांचा एक भाग म्हणून, डिजिटल कोईटा केंद्र (www.kcdh.iitb.ac.in ) स्थापन करण्यासाठी| या संस्थेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय आय टी) मुंबईसोबत  भागीदारी केली आहे. हे प्रतिष्ठान राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एन एच ए) आणि हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (एन ए बी एच) यांच्या डिजिटल आरोग्य उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेते.