खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्यास दाखल होणार गुन्हा

५१३ जणांचा वीजपुरवठा खंडित, ११४ जणांचे काढले मीटर

औरंगाबाद,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेत गुरुवारी (२५ ऑगस्ट) औरंगाबाद शहरातील विविध भागात ५१३ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर वीजपुरवठा खंडित असलेल्या ११४ ग्राहकांचे मीटर व सर्व्हिस वायर काढून घेण्यात आले. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ग्राहकाने परस्पर किंवा शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.      

सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. त्यानुसार शहागंज उपविभागातील हर्सूल, नवाबपुरा शाखेअंतर्गत सईदा कॉलनी, मुझफ्फरनगर, रमाईनगर, जहांगीर कॉलनी, चेतनानगर, मिसारवाडी, हर्सूल, युनूस कॉलनी, कटकटगेट, किराडपुरा येथे कारवाई करण्यात आली. ३८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला, तर ११४ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. ९ ग्राहकांकडून वीजबिल भरून घेण्यात आले. तीन वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत अधीक्षक अभियंता उत्क्रांत धायगुडे, संजय सरग, प्रकाश जमधडे, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर, संजीव कोंडगुळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.याशिवाय क्रांती चौक उपविभागात १९७, चिकलठाणा १८७, गारखेडा ७४ व सिडको, उपविभागात १७ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी सांगितले.    

दरम्यान, या मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतरदेखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच थकीत बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. 
    घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.