विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर

मुंबई ,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व गोंधळ घडला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक समोरासमोर आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘५० खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ ‘गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून आले. शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचे बोलले जात आहे.

चोराच्या मनात चांदणं-अजितदादांनी लगावला टोला

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत आहोत. पण त्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना झोंबल्या. मी अनेक वर्षे विधिमंडळात काम करत आहे, आम्ही सत्तेवर असतानाही विरोधी पक्ष इथे येऊन घोषणा द्यायचा पण आम्ही कधी त्यांना अडवलेले नाही. आम्ही दिलेल्या घोषणांमुळे जनमानसामध्ये आपली प्रतिमा मलीन होत असल्याची शंका शिंदे गटाच्या लोकांना आली आणि आज जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांतर्फे इथे आंदोलन केले गेले, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. मराठी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे चोराच्या मनात चांदणं असा प्रकार घडला, असा टोलाही अजितदादांनी लगावला.

वास्तविक उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ओला दुष्काळ जाहीर न करता काल शेतकऱ्यांच्या तोंडाला ज्याप्रकारे पाने पुसण्यात आली त्यावर एकंदरीतच या घोषणा होत्या पण त्यातील ५० खोके, एकदम ओके ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली, ते नाराज झालेले दिसत आहेत. वास्तविक विधिमंडळात अशा गोष्टी घडत असतात, पण सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातून दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्याचे निष्पन्न झाले आहे, असे अजितदादा म्हणाले.

कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ-शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले

विधीमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीच्या धक्कादायक प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल, तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असे गोगावले म्हणाले.

आमच्या मार्गात आले तर आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली असे म्हणत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, आम्ही डरपोक नसल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.

आम्ही बोलताना त्यांनी येऊन पायऱ्यांवर गोंधळ घालायचा हा कुठला प्रकार आम्ही काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही जसात तसे उत्तर त्यांना आम्ही दिले आहे.

अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचाराचा काळा डाग-आमदार महेश शिंदेंची विखारी टीका

मुंबई : आमच्या आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रकार काही जणांकडून झाला. त्यांचा गैरकारभार आम्ही मिडीयासमोर सांगत असल्याने त्यांना ते सहन झाले नाही, असे शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या विचारधारेवर पडलेला काळा डाग असल्याचे वादग्रस्त वक्तव्यही महेश शिंदे यांनी केले आहे.

विरोधकांना लवासाचे खोकेंच्या घोषणा सत्य घोषणा असल्याने त्यांना त्या कटू वाटल्या. त्यांनी सगळ्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. आमचे मीडियासमोर आंदोलन सुरू असताना गाजर घेऊन येत अर्वाच्च भाषा काही सदस्यांनी वापरली. अमोल मिटकरी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचाराचा काळा डाग असल्याची खोचक टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

सर्वांनी त्यांचे आजचे वर्तन पाहिले, त्यांनी सर्वप्रथम आम्हाला ढकलले, मिटकरी हे लोकशाहीवादी नेते नाहीत, ते जहाल आणि चुकीच्या विचाराचे नेतृत्व असल्याचे शिंदे यांनी म्हटले. मिटकरींसारख्या लोकांमुळे लोकशाहीला धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली, सत्य कटू असल्याने त्यांना पचले नाही. विरोधकांना आमच्या घोषणा सहन झाल्या नाही. बारामतीला गेलेले आणि लुटलेले पैसै बघा, असे महेश शिंदेंनी म्हटले आहे. विरोधकांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली आम्ही केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक आहोत, असे आमदार महेश शिंदेंनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करुन विकृतीचे दर्शन घडवले – आ. अमोल मिटकरी

May be an image of 1 person, beard and standing

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मविआमधील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर नेते उपस्थित होते. त्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचे ठरले होते, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी घडलेला घटनाक्रम सविस्तर विशद केला.

आम्ही १०.३० वाजता आम्ही पायऱ्यांवर पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आंदोलन करायला आलो. मात्र तिथे सत्ताधारीदेखील आंदोलन करत होते. आम्ही त्यांच्यापासून दूर आंदोलन करण्यास सुरुवात केली. आम्ही ‘५० खोके, एकदम ओक्के’ ही घोषणा दिली आणि ती सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागली. आमच्या पक्षातील नेते आ. अनिल भाईदास पाटील यांनी गाजराचा हार गळ्यात घालून शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवण्याचे काम सरकार करत असल्याची घोषणाबाजी केली. मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला धक्काबुक्की करुन पत्रकारांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न झाला. भाजप आमदारांनी आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिंदे गटाच्या आमदारांनी मीडियाला अधिकृत बाईट देऊन कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, अशाप्रकारची धमकीवजा भाषा वापरली.

आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहोत, त्यांच्या आत्महत्येचा जाब विचारत आहोत. ओला दुष्काळ कधी जाहीर करणार अशी मागणी करत आहोत. याचा सरकारला राग का यावा? आमची सत्ता असताना त्यांनी दाऊदच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. पण आम्ही त्यावेळी संयम राखत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, असे मिटकरी म्हणाले.

या गोंधळानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आम्हाला आत येण्याचे निर्देश दिले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सत्ताधारी आमदारांना समज देण्यास सांगितले. आज झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी विकृतीचे प्रदर्शन केले तर आम्ही शांतीचे प्रतिक दाखवून दिले, असे अमोल मिटकरी म्हणाले.