सत्ताधारी पक्षातील सदस्य विरोधकांचे हात- पाय तोडण्याची वक्तव्ये कशी करतात: या सदस्यांना कशाची मस्ती आली आहे-अजितदादांनी खडसावले

मुंबई ,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर आपले विचार सभागृहात मांडले. पुरोगामी महाराष्ट्रात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेली गुन्हेगारी, व्यसनाधीनतेची वाढ, महिलांवरील वाढते अत्याचार, राज्याला निर्माण झालेला दहशतवादी हल्ल्याचा धोका, पोलिसांवरील वाढते हल्ले अशा अनेक गोष्टींकडे अजितदादांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोरोनाशी उत्तमपणे लढा दिला. या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे अजितदादांनी आभार मानले. कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया तसेच इतर साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राला निरोगी, आजारमुक्त करण्यासाठी राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी, असे अजितदादा म्हणाले.

राज्यात काही ठिकाणी दवाखाने नाहीत, कुठे दवाखाने असले तरी तिथे डॉक्टर नाहीत, यातून सामान्य जनता होरपळत आहे. महागाईनमुळे जनता आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याकडे सरकारने अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडिया वापराचे वाढलेले प्रमाण गंभीर आहे. यातून बालगुन्हेगारी, डिप्रेशन अशा गोष्टी वाढत असल्याचे अजितदादा म्हणाले.

राज्यात सायबर गुन्हेगारीही वाढत असून अनेक लोक या सायबर हल्ल्यांचे शिकार होत आहेत. यासाठी ज्या मुलांनी सायबर इंटेलिजन्समध्ये पदवी घेतली आहे अशा मुलांची सायबर शाखेत भरती करण्याची गरज आहे, अशी सूचना अजितदादांनी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, विकासाचे, आरोग्याचे प्रश्न असतील तर सत्तारुढ आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले पाहीजे. एकमेकांकडे बोट दाखवणे बंद झाले पाहीजे. असे झाले नाही तर राज्याची आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिक प्रगती होणार नाही, असे अजितदादा म्हणाले.

राज्याच्या गृह विभागाने कोरोना काळात केलेली कामगिरी जनतेने पाहिली. मविआ सरकारच्या काळात पोलिसांनी सामाजिक बांधिलकी दाखवून केलेल्या कामाची नोंद सध्याच्या सरकारने घेतली पाहीजे. मुंबई शहरातील पोलिसांची व्यथा आज सभागृहात मांडण्यात आली. मात्र अशीच स्थिती ही राज्यातील इतर शहर व ग्रामीण भागात आहे. त्याचाही विचार करण्याची विनंती अजितदादांनी केली.मागील दिड महिन्यात महिलांवर झालेले अन्याय व अत्याचारांवर बोलताना अजितदादांनी राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला घ्यावेसे वाटले नसल्याची आठवणही शिंदे सरकारला करून दिली.

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण घडले तेव्हा तेथील पोलिस अधीक्षकांचे पद रिक्त होते. महाराष्ट्रातील महिलांच्याबाबत हे घडतेय त्यामुळए आपली मान शरमेने खाली जाते असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच पुणे शहर, पाटोदा, मावळमधील कोथुर्णे, बीड येथील ऊसतोड कामगार महिला इ. महिला अत्याचारांच्या अनेक घटनांची यादीच अजितदादांनी सभागृहात वाचून दाखवली. या गुन्ह्यातील नराधमांवर कठोरात कठोर व तात्काळ कारवाई केली तर पोलिसांविषयी आदरयुक्त दबदबा राहील. महिला अत्याचाराला खीळ बसण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा तयार केला. राष्ट्रपती महोदयांनी अलीकडेच या कायद्याला मान्यता दिली आहे. या कायद्यामधून भविष्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसेल, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

राज्यात दहशतवादी हल्ल्याची सूचना आली आहे. गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव असे सण आगामी काळात आहेत. अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी अजितदादांनी केली. मुंबई शहरात अमली पदार्थांचे साठे हजारो कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडण्यात आले. ही किड वेळीच ठेचण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सत्ता आल्यावर आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नाही. आज सत्तेत असलेले उद्या विरोधात बसू शकतात. सत्ताधारी पक्षातील सदस्य विरोधकांचे हात, पाय तोडण्याची वक्तव्ये कशी करतात, या सदस्यांना कशाची मस्ती आली आहे, असे अजितदादांनी खडसावले.

स्व. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी डान्सबार बंदी केली. आज राज्यात सर्रास डान्सबार सुरु आहेत. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन केल्यावर सभागृहात १६ डान्सबार फोडण्याची माहिती दिली. पण मुख्यमंत्री महोदयांच्या ठाणे शहरातच अनेक डान्सबार सुरू असल्याची टीका अजितदादांनी केली. या सर्व डान्सबार्सची माहिती अजितदादांनी सभागृहात मांडली. नावे समोर आल्यावर या डान्सबारवर कारवाई होते, मात्र कालांतराने ते डान्सबार पुन्हा सुरु होतात. कोणालाही पळवाट काढता येऊ नये यासाठी जालीम उपाय काढावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कोणतेही अवैध प्रकरण आपल्यासमोर येते, तेव्हा त्या प्रकरणाला पूर्णपणे आळा घालण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा अजितदादांनी व्यक्त केली. सर्व उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली पाहीजेत, मात्र कोणत्याही राजकीय भूमिकेतून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना कमीपणा आणण्याचा अथवा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करू नये, ती राज्याची परंपरा नाही, असे ते म्हणाले.