वाळू तस्करी व अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य शासन कठोर निर्णय घेणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई ,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात वाळू तस्करीमुळे शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत असल्याबाबत परभणी व बीड जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी भेटी देऊन प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली. त्याचबरोबर, भविष्यात वाळू चोरी व अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या वतीने  कठोर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात वाळू तस्करीमुळे शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत असल्याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी मांडली. यावर उत्तर देताना महसूलमंत्री श्री. विखे- पाटील बोलत होते.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात अधिकारी व  वाळू तस्कर संगनमताने शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करत असल्याची बाब गंभीर आहे. याबाबत कारवाई केली असून दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल. याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.  वाळू उपसा करणारे साहित्य, बोटी, मशीन जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.