मुंबईत पुन्हा २६/११सारख्या हल्ल्याची धमकी

मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

जर त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचे दाखवले जाईल आणि धमाका मुंबईत होईल, असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे. भारतात सध्या ६ लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील, असे धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यासोबतच अन्य तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. त्या पाठोपाठ लगेचच नवरात्रौत्सव, दिवाळी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजली आहे.

यापूर्वी, गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर १६ मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-४७ रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.