दहीहंडी उत्सवाला गालबोट; १४८ गोविंदा जखमी

मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून १४८ गोविंदा जखमी झाले आहेत. दहीहंडी खेळताना मुंबईत १११ गोविंदा जखमी झाले, तर ठाण्यात ३७ गोविंदा जखमी झाले. ८८ गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या. यामुळे यावर्षी कोणत्याही गंभीर जखमी किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही.