आपण देश घडवण्याचा मार्ग अवलंबला : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली,​२०​ऑगस्ट  /प्रतिनिधी :-सरकार बनवण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागत नाही, जेवढी देश घडवण्यासाठी मेहनत करावी लागते. आपण सर्वांनी देश घडवण्याचा मार्ग निवडला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पणजी, गोवा येथे ‘हर घर जल उत्सव’ कार्यक्रमाला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.

मोदी म्हणाले देशासमोरील वर्तमान आणि भविष्यातील आव्हाने आपण सातत्याने सोडवत आहोत. ज्यांना देशाची पर्वा नाही, त्यांना देशाच्या वर्तमान आणि भविष्याचीही पर्वा नाही. असे लोक पाण्यासाठी मोठमोठी आश्वासने देतील, पण मोठी दृष्टी घेऊन काम करू शकणार नाहीत.

केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मोदी म्हणाले की, आज गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे, ज्याने प्रत्येक घरात पाणी प्रमाणित केले आहे. आता १० कोटी ग्रामीण कुटुंबे पाण्याच्या व्यवस्थेशी जोडली गेली आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत गोवा अग्रणी भूमिका बजावत आहे. मी गोव्यातील लोकांचे, प्रमोदजींचे आणि त्यांच्या टीमचे, स्थानिक संस्थांचे अभिनंदन करतो. तुमचे प्रयत्न देशाला प्रेरणा देणारे आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी अनेक राज्ये त्यात सामील होणार आहेत. तीन वर्षांत ७ कोटी घरांपर्यंत नळाची सुविधा पोहोचली. जल जीवन अभियानांतर्गत देशात अवघ्या तीन वर्षांत १० कोटी कुटुंबांना नळ सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ही काही छोटी उपलब्धी नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकांमध्ये देशातील केवळ ३ कोटी ग्रामीण कुटुंबांना पाइपद्वारे पाणी उपलब्ध होते.

आता भारतातील रामसर साइट्स आणि पाणथळ जागांची संख्याही ७५ झाली आहे. त्यापैकी ५० साइट्स गेल्या ८ वर्षांत जोडल्या गेल्या आहेत. म्हणजेच भारत जलसुरक्षेसाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे आणि त्याचे परिणाम प्रत्येक दिशेने मिळत आहेत.