शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार – बच्चू कडू

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार येत्या १५ सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी मला शब्द दिला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करू, असे त्यांनी मला सांगितल्याचे बच्चू कडू म्हणाले. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना नाराजी बाबत पुन्हा छेडले होते. यावेळी त्यांनी हे उत्तर दिले.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही काही क्षणाची नाराजी आहे. सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता. त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद मिळायला हवे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतू पहिल्या विस्तारात कडूंचा नंबर लागला नव्हता. तसेच १८ जणांना एकाचवेळी कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. पुढच्या विस्तारात बहुतांश मंत्रिपदे ही राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. यामुळे नाराजांची राज्य मंत्री पदावर बोळवण होण्याची शक्यता आहे.