रायगडमधील संशयास्पद बोट प्रकरणी हाय अलर्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई, १८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील संशयास्पद बोट प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. सणासुदीचे दिवस लक्षात घेता या भागात हाय अलर्ट देण्यात आला असून आवश्यक ती सर्व काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवेदनात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर श्रीवर्धन किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स आणि  दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.

याबाबत तत्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे, तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक २६ जून २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. १३.०० वा. सुमारास एका कोरिअन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान’ या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे.

या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे.