विमान प्रवासात मास्क लावणे बंधनकारक:डीजीसीएचे सर्व विमान कंपन्यांना निर्देश

नवी दिल्ली,१८ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. यापार्श्वभूमीवर विमान प्रवासात आता मास्क लावणे बधनकारक करण्यात आले आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएने याबाबतचे निर्देश सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.

डीजीसीएने आपल्या निर्देशांमध्ये म्हटले की, ‘विमान कंपन्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही याची खात्री करावी. तसेच या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अचानक विमानांची तपासणी देखील केली जाईल. जर या नियमांचं उल्लंघन झालेले आढळले तर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल.’

दिल्लीत १ ऑगस्टपासून १०० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सध्या दररोज ५ हून अधिक कोरोना ससंर्गबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दोन दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणंही वाढले आहे. दुसरीकडे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि १४ ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८८२ वर पोहोचली आहे.