कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून द्यावा- जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद,दि.4 – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नवीन निकषांनुसार कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आता वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत आहे. तरी सर्व खासगी रुग्णालयांनी जास्तीत जास्त रुग्णांना या योजने अंतर्गत लाभ मिळवून द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खासगी रुग्णालयामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या कोरोना उपचारांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सहाय्यक संचालक (समाजकल्याण) शिवाजी नाईकवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, सह संचालक (सांख्यिकी) किरण कुमार धोत्रे, धुत हॉस्पीटलचे डॉ. हिमांशू गुप्ता, युनायटेड हॉस्पीटलेच डॉ. अजय रोटे, बजाज हॉस्पीटलच्या डॉ. नताशा वर्मा, हेगडेवार हॉस्पीटलचे अश्विनी कुमार तुपकरी, एमजीएम हॉस्पीटलचे डॉ. सुनिल डोरले, वाय. एस. के. हॉस्पीटलचे डॉ.व्ही.आर.खेडकर, एमआयटी हॉस्पीटलचे डॉ. आर. एस. प्रधान, डॉ. जावेद कुरैशी ,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. जोशी, श्री. फनेंद्र, यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.

कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी योजनेचे नवीन निकष करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेत आता वीस पॅकेज समाविष्ट करण्यात आले असून या अंतर्गत कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याबाबत खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य पद्धतीने माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने प्राधान्याने पुढे यावे. तसेच खाजगी रूग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन, सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्यमित्र यांनी ही कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबंधितांना दिल्या. तसेच योजना अंमलबजावणी बाबत रुग्णालय निहाय विविध बाबींवर यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांकडून माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *