पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

मुंबई ,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. या भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु आहे. राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.

गोंदिया जिल्ह्यात दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत गोंदिया जिल्हा तसेच मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी १७३.५ मि.मी. हून अधिक पाऊस झाल्याने तसेच वैनगंगेच्या बाघ उपनदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात एसडीआरएफचे एक पथक व स्थानिक शोध बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदी पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात निर्माण झालेली पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून जिल्ह्यातील एकूण १८ रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF ची ०२ पथके व स्थानिक शोध व बचाव पथकांमार्फत पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु आहे.

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात

राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, पालघर – १, रायगड – महाड – २, ठाणे – २, रत्नागिरी –चिपळूण – १, कोल्हापूर – २, सातारा – १, सांगली – २ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.

नांदेड – १, गडचिरोली – २, भंडारा – १ अशा चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३५० गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२२ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.