इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडून विभागाचा आढावा

मुंबई ,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या  विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासमोर करण्यात आले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व भौतिक योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी उपसचिव (आश्रमशाळा विभाग) कैलास साळुंखे, संचालक सिध्दार्थ झाल्टे, उपसचिव महामंडळे  श्री. सहस्त्रबुध्दे, उपसचिव श्री. जनबंधू, महाज्योतीचे व्यवस्थापक प्रदीप डांगे यासह इतर अधिकारी  उपस्थित होते.

अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार सादरीकरणादरम्यान म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी हा विभाग स्वतंत्रपणे काम करत असून विभागामार्फत  इतर मागास बहुजन घटकातील नागरिकांसाठी वैयक्त‍िक व समूह विकासाच्या योजना राबविण्यात येतात. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘निपुण भारत’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांसाठी कौशल्य विकसित करण्यात येत आहे.

“महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) ही संस्था या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणारे इतर उपक्रम व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेसाठी भरीव तरतूद, बंजारा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी या बैठकीत सादर केली.