महिलेचा विनयभंग करुन बदनामी केल्यास जीवे मारण्‍याची धमकी दिल्या प्रकरणात आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-घरात घुसून महिलेचा विनयभंग करुन बदनामी केल्यास जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणात आरोपी राजकुमार रामचंद्र चौधरी (५७, रा. रोहिदासपुरा, जुना मोंढा) याला एक वर्षे साधा कारवास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली होती. याविरोधात आरोपीने दाखल केलेल्या अपीलात प्रधान जिल्हा न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी आरोपीचे वय पाहता त्‍याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेला दंड पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणुन देण्‍याचे तसेच प्रथम वर्ग न्‍यायालयाने ठोठावलेला आठ हजाररुपयांचा दंड शासन दरबारी जमा करण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले.या प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले.

या प्रकरणात ४३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १९ ऑगस्‍ट २०१४ रोजी पीडिता ही तिच्‍या आई व मुलासह घरात झोपलेली होती. मध्‍यरात्रीनंतर सुमारे एक ते दोन वाजेच्‍या सुमारास आरोपी राजकुमार चौधरी हा पीडितेच्‍या घरी आला. त्‍याने दार वाजवून पीडितेला उठवले. पीडितेने इतक्या रात्री तुझे काय काम आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. त्‍यावर आरोपीने इतक्या रात्री माणुस कशासाठी येतो हे तुला समजत नाही का असे म्हणत पीडितेचा हात पकडला. ” मी तुझ्यावर दोन वर्षांपासून प्रेम करतो, तुला कळत नाही का, तु माझा विचार कर मी समाजाचा प्रतिष्‍ठीत नागरिक आहे. तु माझे ऐकले नाही व बदनामी केली तर तुला जीवंत सोडणार नाही” अशी धमकी देत पीडितेचा विनयभंग केला. या प्रकरणात जिन्‍सी पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.