राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज:महागाई भत्त्यात वाढ- राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे. 

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी त्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा

दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती उत्सवापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्यानं कर्मचारी आनंदात आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्के वाढ केलीय. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.