‘ना त्यात अक्षरे बदलली ना शब्द’ पत्रावरून फडणवीसांची विरोधीपक्षावर टीका

मुंबई ,१७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलेल्या सातपानी पत्रावरून जोरदार टीका केली. यातली मधली चार पाने बहुदा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विरोधीपक्षाला त्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकत सातपानी पत्र आम्हाला दिले. ‘आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातील चार पाने विरोधीपक्षाने आम्हाला पाठवली, ना त्यात अक्षरे बदलली ना शब्द’ असा दावा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला. पत्र देताना विरोधीपक्षाला विस्मृती झाली असावी, की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

पत्रकार परिषदेत मविआ सरकारवर टीका करताना फडणवीसांनी दोन्ही सरकारमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले. फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर सर्वच क्षेत्रासाठी मविआ बेईमानीचे आणि नुकसानीचे सरकार होते. जनतेचा कौल डालवून ते सरकार स्थापन झाले होते. पण, आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकत्रित येऊन मते मागितली होती, ते दोन पक्ष आज सत्तेत आले आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.