औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य -मंत्री संदीपान भुमरे

घरोघरी तिरंग्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत एक लाख महिलांच्या खात्यात 42 कोटी जमा

•  मतदार यादी पुनरीक्षणात जिल्हा विभागात प्रथम

जिल्ह्यात विविध आवास योजनेंतर्गत 31 हजार घरकुले पूर्ण

पीक विमा योजनेत तीन लाख 22 हजार हेक्टर क्षेत्राचे 1 हजार 390 विमा संरक्षण

औरंगाबाद,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-कोविड लसीकरण, प्रधानमंत्री मातृत्व वंदन, मतदार नाव नोंदणी, संतपीठाचा विकास, वृक्ष लागवड, सिंथेटिक ट्रॅक,  महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती आदींसह जिल्ह्यात विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून जिल्ह्याचा विकास होतो आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

May be an image of 3 people and people standing

विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले.  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  मुख्य शासकीय समारंभात झेंड्यास सलामी दिल्यानंतर शुभेच्छा संदेशात मंत्री भुमरे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. एम. प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, सर्व विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

May be an image of 5 people and people standing

मंत्री भुमरे म्हणाले,  सामूहिक प्रयत्नांनी चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करून कोरोना सारख्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी अजूनही सतर्क राहणे मात्र आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने लसचे डोस पूर्ण करावेत.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत औरंगाबाद राज्यात दुसरा आहे. मतदार यादीत नाव नोंदणीकरीता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार दिवशी नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मतदार यादीतील नोंदी प्रमाणीकरणासाठी आणि दुबार नाव नोंदणी टाळण्यासाठी 1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्र आधार जोडणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

पैठणच्या संतपीठासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.इको बटालियन व CSR च्या मदतीने गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो आहे. शासनाने 2021 मध्ये   66 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु जिल्ह्याने तब्बल 85 लाख झाडे लावून त्याचे संगोपन केले. 127 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आपला जिल्हा यशस्वी झाला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या आत्मनिर्भरतेसाठी ‘उभारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून 119 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अनेक योजनांचा लाभ देऊन मदत करण्यात आली आहे. महाआवास ग्रामीण अभियानामध्ये औरंगाबाद विभागात प्रथम आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपले राज्य देशात तर आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात साडेसात लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केलेले आहेत. आजपर्यंत 7 लाख 4 हजार 581 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झालेली आहे. कापूस, सोयाबीन व ऊस या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमा अंतर्गत 53 हजार कृत्रिम रेतन करण्यात आलेले आहे. पोर्टलवर 100 टक्के नोंदी करण्यात येऊन जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.क्रीडापटूंना खेळात प्राविण्य मिळविता यावे म्हणून विभागीय क्रीडा संकुलात मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक होणार आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच साईच्या निवासी प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना सरावाकरिता अतिरिक्त व्यवस्था निर्माण होणार आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तसेच जिल्हातील महामार्गाचे जाळे जिल्ह्यासाठी विकासाची संजीवनी ठरणार आहे. जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने निराधार, दिव्यांग, तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या व्यक्तींना नवीन 200 रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे. 26 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 4 लाख गरजुंना भोजनाचा लाभ मिळाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामामध्ये 992 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेले आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 41 हजार शेतकरी लाभार्थ्यांना 998 कोटी इतक्या रकमेच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे.  डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत सन 2021-22 मध्ये 73 हजार लाभार्थ्यांना 662 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

अग्निवीर अंतर्गत सैन्य भरतीची प्रकिया सुरू असून 76 हजार तरुणांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.  प्रशासनाने अनेक संस्थाच्या मदतीने या भरती दरम्यान सर्व सुविधांची व्यवस्था केलेली आहे. तरी तरुणांनी या भरतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळावा आणि तो स्वावलंबी व्हावा यादृष्टिने आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत मागील दोन वर्षामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

रोजगार हमी योजनेतील कामांबाबत सांगताना ते म्हणाले, सन 2021-22 वर्षात 54 हजार हेक्टर क्षेत्रावर रोहयो अंतर्गत फळबाग लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ड्रॅगन फ्रुट, शेवगा, केळी व द्राक्षे, इत्यादी पिकांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात आला. मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत राज्यात 25 हजार किलो मीटर रस्त्यांना मान्यता देण्यात आली. पैठण येथे राज्यातील दुसरे सिट्रस इस्टेटला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे फलोत्पादनास चालना मिळाली आहे. फळबाग योजनेअंतर्गत फळझाडातील अंतरात शिथीलता आणली त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ झाली, असेही भुमरे म्हणाले.

May be an image of 5 people and people standing

मुख्य शासकीय समारंभात कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, संतोष जोशी,  पोलिस उपनिरीक्षक कृष्णा हिसवणकर यांचा राष्ट्रपती शौर्य पोलिस पदक प्रदान करत गौरव केला.

May be an image of 5 people and people standing

पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना आहरण संवितरण गौरव पुरस्कार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना आयर्नमॅन हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचाही  मंत्री भुमरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.