‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत जिल्ह्यात 4 लाख घरांवर तिरंगा ध्वज फडकणे देशाप्रती आदराची भावना – सहकार मंत्री अतुल सावे

‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ सांस्कृतिक उपक्रमासाठी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 346 कोटी 88 लाख रुपयांचा पिक विमा जमा

परभणी,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवातंर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजन करुन ते यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली होती. ‘हर घर तिरंगा ‘ अभियानाचा मुळ उद्देश देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागरुकता वाढविणे हा आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील 4 लाख घरांवर तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा ‘ अभियानात जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाल्याने प्रत्येकाच्या मनातील देशाप्रती असलेली आदराची भावना व्यक्त होत आहे, ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

May be an image of 6 people, people standing, outdoors and text that says "जिल्हाधिकारी कार्यालय परभणी"

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फोजिया खान, आमदार सर्वश्री मेघनाताई बोर्डीकर, राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, महानगर पालीका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे राबविलेल्या ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ या सांस्कृतीक उपक्रमाच्या आयोजनासाठी व त्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो.

May be an image of 9 people and people standing

मागील 75 वर्षांचा इतिहास आपल्यासाठी आश्वासक असला तरी आपल्या जिल्ह्यासमोर, राज्यासमोर, देशासमोर अनेक समस्या आजही आहेत ही वास्तवीकता आपण नजरेआड करुन चालणार नाही. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, कामगार वर्गाच्या समस्या, व्यावसायिक वर्गाच्या समस्या, स्त्रीयांवरील अत्याचार, दिव्यांगांच्या समस्या, आपणांस प्राधान्याने सोडवायच्या आहेत. यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न तर केले जातीलच शिवाय आपण सर्व मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे सांगून नवभारताचे स्वप्न साकारणासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले.

शेकडो वर्षे पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस परकीय जोखडातून मुक्त करण्याच्या घटनेस आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वांतत्र्य प्राप्तीसाठी अंसख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटीश जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्य लढ्या दरम्यान काळया पाण्याची शिक्षा भोगावी लागली. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यासारख्या थोर स्वातंत्र्यसेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढयात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वदंन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे सांगून हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली याचा राष्ट्र म्हणून तुम्हा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतामधील लोकशाही मुल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. आपल्या देशाने मिश्र पध्दतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे, असे श्री. सावे यांनी सांगितले.

मागील दोन वर्षामध्ये संपूर्ण जग कोविड सारख्या महामारीने उध्वस्त झाले. यामुळे अनेकांना आपल्या स्वकीयांना गमावले याचे दुख: आहे. जगातील विकसीत देशांच्या आरोग्य यंत्रणा, आर्थिक यंत्रणा अपयशी ठरत असतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरिक व राज्य सरकारे यांच्या सहकार्याने या महामारीच्या काळात राष्ट्र म्हणून जगात भारताने आपले जागतिक सत्तास्थान निर्माण केले आहे. प्रधानमंत्री यांनी देशात कोविड आजारा विरोधी लढा देणाऱ्या वैज्ञानिकांना, संशोधकांना विश्वासात घेऊन, प्रसंगी पाहिजे तेवढी मदत करुन देशात या आजारावर लस विकसित करुन घेतली. सुमारे 175 कोटी पेक्षाही जास्त लसीच्या मात्रा देशवासीयांना देण्यात आल्या. ही निश्चीतच देशासाठी एक भुषणावह बाब आहे, असे प्रतिपादन श्री. सावे यावेळी म्हणाले.

आर्थिक बाजूने सुध्दा देशाची उल्लेखनीय प्रगती होत असतांना आपण पाहत आहोत. कोविड महामारीवर मात करुन देशाने आर्थिक चक्र वेगाने सुरु ठेवले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही निर्माण झालेले नाहीत, एवढे राष्ट्रीय महामार्ग प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली व नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आले, ही देशासाठी गौरवास्पद बाब आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यासाठी वरदायी ठरु पाहणारा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून साकार होतांना आपण पाहत आहोत. याच दृतगती महामार्गास नांदेड-जालना हा दृतगती महामार्ग जोडला जात आहे. त्यामुळे आपल्या परभणी जिल्ह्यातून एकूण 94 कि.मी. लांबीचा हा महामार्ग जात आहे,असेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2021-2022 करीता जिल्ह्यातील 6 लाख 28 हजार 84 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. तसेच जुलै ते सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 3 लाख 88 हजार 571 शेतकऱ्यांच्या खात्यावर 317 कोटी 18 लाख रुपयांचा पिक विमा जमा करण्यात आला आहे. तर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात अंतर्गत 7 हजार 179 शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 8 लाख रुपयांचा पिक विमा जमा करण्यात आला आहे. पिक कापणी प्रयोगावर आधारित 47 हजार 405 शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 कोटी 92 लाख पिक विमा जमा करण्यात आला आहे. म्हणजे एकुण पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी 4 लाख 43 हजार 155 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकुण 346 कोटी 88 लाख रुपयांचा पिक विमा जमा करण्यात आला असल्याचे सांगितले.

May be an image of 7 people, people standing and text that says "भणी"

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2021-2022 अंतर्गत जिल्ह्यातील 7 हजार 111 शेतकऱ्यांनी शेतात बसविलेल्या ठिबक व तुषार संचाचे 1231 कोटी रुपये अनुदान महा डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून सन 2016 ते 2021 पर्यंत जिल्ह्यात एकत्रित 6 हजार 894 घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 5 हजार 727 एवढी घरकुले पूर्ण झाले असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सहकार मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोक प्रतिनीधी, अधिकारी-कर्मचारी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पत्रकार यांची उपस्थिती होती.